श्रीपूर चालक-मालक संघटने कडून श्रीपूर परिसरात भव्य वृक्षारोपण
सोशल मीडियावरती सर्व सदस्यांचे होत आहे कौतुक.

श्रीपूर तालुका माळशिरस येथील चालक-मालक संघटनेच्या सर्व सदस्यांनी श्रीपूर मधील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बोरगाव रोड लगत ट्रॅक्टर यार्ड स्थळावरती , श्रीपूर स्मशानभूमी मध्ये, प्रकाशनगर नजदीक, श्रीपूर – डी 19 रोड लगत, श्री चंद्रशेखर विद्यालया भोवती, शहीद निवृत्ती जाधव स्मारकासमोर, भव्य असे वृक्षारोपण केले. मोहगनी, लिंब, चिंच, पिंपळ, वड, गुलमोहर, अशा सहा ते सात फूट उंच मोठ्या झाडांचे आणि त्या झाडांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी ट्री गार्ड चे नियोजन करून, जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून, सर्व संघटनेच्या सदस्यांनी झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण केले. या संघटनेकडून 150 झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे, पैकी आज 51 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कार्याबद्दल संघटनेच्या सर्व सदस्यांचे सोशल मीडियावरती कौतुक केले जात आहे.
पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ..यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाडांची पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एम आर कुलकर्णी, हनुमंत नागणे सिव्हिल इंजिनियर, संतोष कुमठेकर केन मॅनेजर ,सचिन ताम्हाणे एनवोर्मेन्ट ऑफिसर, भीमराव बाबर, राहुल शिवाजी साठे , महादेव सलगर, नामदेव नाईकनवरे, सुरज पिसे, चालक-मालक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणा मुळे श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. या सर्व बाबींचा विचार करून या संघटने मार्फत वृक्षारोपण करण्यात आले आहे. भविष्यामध्ये आणखीन वृक्षारोपण केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य-
“झाडांमुळे सर्व परिसराचे, घराचे, बंगल्याचे, सौंदर्य खुलते. एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो. तेथील पर्यावरण स्वच्छ राहते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संतोक्ती प्रमाणे ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ही मोहीम श्रीपूर चालक-मालक संघटने कडून हाती घेतली आहे. त्यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”- डॉ.यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक