महाळुंग प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात महिला दिन उत्साहात साजरा
महिलांच्या कामाचे कौतुक करुन केले सत्कार

आशा सेविकांचे कार्य नोकरी नसून, समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाची सेवा आहे – दत्ता नाईकनवरे
श्रीपूर तालुका माळशिरस येथील गावठाण महाळुंग प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये महिला दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाळुंग- श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, आरोग्य विभागाचे सभापती सोमनाथ मुंडफणे, पत्रकार दत्ता नाईकनवरे, ज्येष्ठ आरोग्य सेविका शमा जगताप, पैलवान अशोक चव्हाण, सुपरवायझर बनसोडे मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी आपल्या विभागामध्ये काम करत असणाऱ्या अशा सेविकांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते, त्यांचे सत्कार व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ता नाईकनवरे यांनी, “सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा हा दिवस आपल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, महिला दिनाच्या निमित्ताने, विशेषत: आशा कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे आहे. आपले कार्य केवळ एक नोकरी नसून, समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. कमी मानधनावरती तुम्ही वाडी, वस्तीवर, गावातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन, लोकांच्या आरोग्याची काळजी घेता, लहान मुलांची, गरोदर मातांची देखभाल करता. तुम्ही आरोग्य शिक्षण, लसीकरण, पोषण आणि स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या गोष्टी घराघरांत पोहोचवता. तुमच्या अथक परिश्रमांमुळेच आपल्या समाजामध्ये बालमृत्यू दर कमी झाला आहे, आई-बाळाच्या आरोग्याची सुधारणा झाली आहे आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. कोविड-19 सारख्या कठीण काळातही तुम्ही जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे.”
“महिला दिन हा केवळ स्त्रियांच्या अधिकारांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याचा आणि त्यांना अधिक ताकद देण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा शाब्बासकीची थाप देणारा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाने आणि समाजातील प्रत्येक घटकांनी तुमच्या कामाची योग्य किंमत देऊन आदर करायला हवा. तुमच्या सर्वांच्या परिश्रमासाठी आणि समर्पणासाठी तुमच्या कार्याला आणि तुम्हाला सलाम. तुम्हीच खऱ्या अर्थाने आपल्या समाजाच्या आरोग्याच्या रक्षणकर्त्या आहात. असे मनोगत पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाळुंग श्रीपूर विभागातील सर्व आशा सेविका, महिला ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामा जगताप यांनी मानले तर आभार बनसोडे मॅडम यांनी मानले.