मिरे-करोळे बंधारा पाण्याखाली | बंधाऱ्यावरील पूलरस्ता बंद | भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका
प्रशासनाकडून नदी काठावरील गावे, वस्त्या, संवेदनशील व पूरबाधीत होणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

प्रशासनाकडून नदी काठावरील गावे, वस्त्या, संवेदनशील व पूरबाधीत होणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
श्रीपूर (दत्ता नाईकनवरे) : धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा आणि नीरा या दोन्ही नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मिरे – करोळे, वाफेगाव, जांभूड, पट कुरोली या गावातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे नदी काठाच्या गावातील शेतात नदीचे पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे, तर नदी काठच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
माळशिरस तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली नसली तरी,भीमा व नीरा खोर्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने वीर धरणातून नीरा नदीत व उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे, उजनी धरणाच्या संडव्यातून सोमवारी सायंकाळी 1लाख 25 हजार क्यूसेस चा विसर्ग तर वीज निर्मिती प्रकल्पातून 1 हजर 600 क्यूसेस, असा एकूण 1 लाक्ष 26 हजार 600 चा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे.
तसेच वीर धरणातून सोमवारी 33 हजार 708 क्यूसेसचा विसर्ग नीरा नदीत मिसळत होता, हे पाणी नीरा – नरसिंगपूर, संगम येथून भीमा नदीत मिसळत असल्याने, भीमा नदीने रूद्र रूप धारण केले आहे यामुळे नदीकाठच्या गावत पाणी शिरण्यास सुरूवात झालेली आहे. माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
भीमा नदीवरील नेवरे – नांदोरे, करकंब या गावांना जोडणारा पूल सोमवारी सायंकाळी सहा पर्यंत तरी पाण्याखाली गेला नसल्याने या पुलावरून सुरळीत वाहतुक सूरू असली तरी, करोळे ते मिरे बंधा-यावरील रस्ता बंद, आव्हे ते जांभुड बंधा-यावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. नदी काठावरील गावे, वस्त्या, संवेदनशील व पूरबाधीत होणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कोणतीही अडचण आल्यास महसूल अथवा पोलीस प्रशासनास संपर्क साधावा. संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“उजनी धरणातून भीमा नदीत 1 लाख 25 हजार क्यूसेस चा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे, तर वीर धरणातून सोमवारी 33 हजार 708 क्यूसेसचा विसर्ग नीरा नदीत मिसळत होता, हे पाणी नीरा – नरसिंगपूर, संगम येथून भीमा नदीत मिसळत असल्याने, भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये तसेच पूरबाधीत होणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावे.”-सुरेश शेजुल, (तहसीलदार माळशिरस)
फोटो : भीमा नदीवरील मिरे – करोळे गावांना जोडणारा बंदरा पाण्याखाली गेलेला दिसत आहे, तर पुर सदृश्य परिस्थितीची पाहणी करताना तहसीलदार सुरेश शेजुल, मंडलाधिकारी विजय लोखंडे, तलाठी जमदाडे व तलाठी क्षीरसागर कोतवाल संभाजी चव्हाण व अंकुश नवगिरे आदी मान्यवर दिसत आहेत.