संत व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली – सुहास उरवणे,ज्येष्ठ साहित्यिक
ग्रामीण संस्कृती व परंपरांना मराठी भाषेने एक वेगळी उंची प्राप्त करुन दिली आहे

अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे) मराठी भाषेला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानदेव महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पासून ते आद्य कवी मुकंदराज व आजवरच्या साहित्यिकांनी ही मराठी भाषा समृद्ध केली आहे. ग्रामीण संस्कृती व परंपरांना या भाषेने एक वेगळी उंची प्राप्त करुन दिली आहे व ती आजही टिकून आहे. ही भाषा टिकली तरच महाराष्ट्र टिकेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुहास उरवणे यांनी व्यक्त केले .
महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळ व इंग्लिश स्कूल वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक सुहास उरवणे यांच्या ” माझा मराठीची बोलू कौतुके” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी उरवणे प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.बी. पवार हे होते.
प्रारंभी महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,मातृभाषेविषयी अभिमान असावा.गलीतत्राण झालेल्या संस्कृतीला उच्च स्थान प्राप्त करुन देण्याचे काम मराठी भाषेने केले आहे.आज या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे ही बाब मराठी भाषिकांसाठी अभिमानाची असल्याचे ते म्हणाले .
या कार्यक्रमास ग्रामीण साहित्य विकास मंडळाचे सचिव तानाजी बावळे,सदस्या संजीवनी घोडके,स्वाती जाधव,वीरेंद्र पतकी,उप मुख्याध्यापक पी.एम. शिवशरण,पर्यवेक्षक बी.एस. सावळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी.कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.टी.शिंदे यांनी केले.