श्रीपूर | साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा झाला एमडी परीक्षा पास
राज्य सरकारच्या लेखी परीक्षा व मुलाखतीमधील गुणपत्रकानुसार कार्यकारी संचालक पद निश्चित

एका सर्वसामान्य कुटुंबातील व साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा, शिकून साखर कारखान्यात फायनान्स मॅनेजर झाला, आता तर थेट कार्यकारी संचालकपदासाठी अभ्यास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर आपले नाव कोरले आहे.
दत्ता नाईकनवरे,श्रीपूर :
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या कार्यकारी संचालक (MD) पदासाठीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील करोळे गावचे सुपुत्र हनुमंत नवनाथ करवर यांनी, कार्यकारी संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव लौकिक केले आहे. परीक्षा पास झाल्याबद्दल सर्व मित्रमंडळी, पाहुणे ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात, अभ्यास, जिद्द व चिकाटीच्या जोरावरती, घरच्या परिस्थितीची जाण ठेवून, हनुमंत यांनी अनेक साखर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती नोकरी केल्या आणि राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लेखी परीक्षा घेतली जाते व मुलाखतीमधील गुणपत्रकानुसार कार्यकारी संचालक पद निश्चित केले जाते. त्या परीक्षेमध्ये यश संपादन करून कार्यकारी संचालक पदासाठी आपले नाव निश्चित केले आहे.
हनुमंत करवर यांचे वडील नवनाथ करवर हे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये फिडपंप मॅन म्हणून काम करतात. साखर कारखाना कामगाराच्या या मुलाने उच्च शिक्षण घेत, वित्तीय क्षेत्रात जबाबदारी सांभाळली. फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत याच मुलाने वडिलांचे नाव आणखी मोठे करत आता थेट साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदावर आपले नाव कोरले आहे.
बारामती तालुक्यातील भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे हनुमंत नवनाथ करवर यांची कार्यकारी संचालक (एमडी) पॅनल लिस्ट मध्ये नियुक्ती झाली आहे.
कारखान्यात वित्तीय व्यवस्थापक म्हणून काम करत, करवर यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, रसिक सरक, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, कामगार नेते युवराज रणवरे आदींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण विद्या विकास मंदिर उंबरे पागे येथे झाले आहे. तर बारावीपर्यंतचे शिक्षण श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणगाव कनिष्ठ महाविद्यालय,श्रीपूर आणि बी कॉम आणि एमबीए विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी झाले आहे.
हनुमंत करवर हे छत्रपती कारखान्यात सन २०२० पासून वित्तीय व्यवस्थापन पदावरती कार्यरत आहेत. करवर हे करोळे (ता. पंढरपूर) येथील मूळ रहिवासी असून आतापर्यंत त्यांनी माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखाना, बबनराव शिंदे, शरयू अॅग्रो या कारखान्यात काम केले आहे. यावर्षी ५० जणांची नव्याने कार्यकारी संचालक पदा साठी नियुक्ती झाली आहे.