महाराष्ट्र

रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न | B.Sc. Agri

सहाय्यक आयुक्त माजी विद्यार्थिनी होत्या प्रमुख पाहुण्या

अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे) शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज  संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु.अमृता लालासो शिर्के (सहाय्यक आयुक्त अन्न  गट-अ महाराष्ट्र शासन) या होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर चतुर्थ वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपले चार वर्षातील अनुभव आणि व जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थींनी कु.अमृता शिर्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास, सातत्यपूर्ण मेहनत,आणि योग्य दिशेने वाटचाल करावी लागते तर स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी चिकाटी,संयम,मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो.तसेच ए प्लॅन बरोबर बी प्लॅनची ही तयारी असली पाहिजे.अशा प्रकारे प्रोत्साहन पर मनोगत व्यक्त केले.शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्राचार्य आर.जी.नलावडे यांनी विद्यार्थ्यांना,तुम्ही कुठेही नोकरी,व्यवसाय,उत्तम शेती, स्पर्धा परीक्षा तसेच पुढील शिक्षण घ्या पण आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने आणि आदर्शपणे वागा असा सल्ला दिला आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.आर. आडत,प्रा.एन.बी.गाढवे इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.

रत्नाई कृषी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु.अमृता लालासो शिर्के यांची सहाय्यक आयुक्त अन्न  गट – अ महाराष्ट्र शासन या पदी निवड झाली आहे.त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षामधून महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक तर सर्वसाधारण प्रवर्गातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे यांनी त्यांचा सत्कार केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!