भीषण आग : राज ॲग्रो कोल्ड स्टोरेज अँड पॅकिंग हाऊसच्या नवीन युनिटला लागली भीषण आग
कोट्यावधी रुपयाचे नुकसान

भीषण आग : राज ॲग्रो कोल्ड स्टोरेज अँड पॅकिंग हाऊसच्या नवीन युनिटला लागली भीषण आग
कोट्यावधी रुपयाचे नुकसान
श्रीपूर : तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर रोड लगत राज ॲग्रो कोल्ड स्टोरेज अँड पॅकिंग हाऊसच्या नवीन युनिटला आज सायंकाळी सहाचे सुमारास आग लागली. हे कोल्ड स्टोरेज बेदाणा आणि सोयाबीनच्या पोत्याने गच्च भरलेले होते. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांचीच धावपळ उडाली. आग विजवण्यासाठी सर्व कामगारांनी शर्तीचे प्रयत्न केले. उन्हाचा तडाका आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आकाशात उंच असे आगीचे मोठे लोळ सर्वत्र दिसू येत होते.
आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु, शेतकऱ्याने आपला माल कोल्ड स्टोरेजला ठेवलेला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. अंदाजे मालाचे चाळीस कोटी रुपये पर्यंत नुकसान झाले असल्याची शक्यता प्रत्यक्ष दर्शी मधून वर्तवली जात आहे.
सुरुवातीला आग आटोक्यात न आल्यामुळे, सर्वच अग्नीशामक यंत्रणेला मदतीसाठी बोलवण्यात आले. त्यामध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, विठ्ठलराव शिंदे शुगर फॅक्टरी, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, पंढरपूर नगरपरिषद, अकलूज नगर परिषद, स्थानिक टँकर मालकानी, मोठ्या प्रमाणात शर्तीचे प्रयत्न करून आगीवर उशिरापर्यंत नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले.
आगीचे कारण अध्याप स्पष्ट झाले नाही, प्राथमिक अंदाज शॉर्टसर्किटने आग लागल्याचे बोलले जात आहे. आग पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे आणि मोबाईल वरती शूटिंग करणाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती, त्यामुळे आग विजवण्यासाठी व अग्निशामकला रस्ता मिळण्यासाठी व्यत्याय येत होता. त्यासाठी श्रीपूर पोलीस स्टेशनने बंदोबस्त ठेवून लोकांना बाजूला पांगविले. महाळुंग-श्रीपूर परिसरातील व स्थानिक नागरिकांनी जीवाची परवा न करता सर्वांनी आग विझवण्यासाठी आप आपल्या परीने मोठे शर्तीचे प्रयत्न केले. रात्री साडेनऊ पर्यंत बऱ्यापैकी आग आटोक्यात आली होती, परंतु आतील जळत असलेला माल मोठ्या प्रमाणात आग धूमसवत होता. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक सायरनचे आवाज परिसरामध्ये ऐकू येत होते.