अनेक स्ट्रीटलाईट चोरीला-टोलनाका भरतेय पण सुरक्षा गायब!-एकाच ठिकाणी सतत अपघात सत्र सुरू
हाय मास्टर दिव्यांची मोठ्या प्रमाणावर चोरी; पालखी महामार्गाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

महाळुंग-श्रीपूर-बोरगाव महामार्गावर अंधाराचे सावट; चोरट्यांचा मुक्त संचार
हायवेवरील दिवे चोरीला; पालखी-राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा ढिसाळ कारभार
ठिकाण – श्रीपूर-महाळुंग-बोरगाव, नॅशनल हायवे 965 जी
संपादक – दत्ता नाईकनवरे | इन महाराष्ट्र न्यूज
श्रीपूर तालुका माळशिरस येथील संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल हायवे 965 जी वर महाळुंग-श्रीपूर-बोरगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर हाय मास्टर दिव्यांची व मरक्युरी स्ट्रीट लाईट्सची चोरी सुरू असल्याचा गंभीर प्रकार सतत घडत आहे. संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा चोर फायदा घेत आहेत. त्यामुळे सतत असे प्रकार परिसरामध्ये घडत आहेत.
आत्तापर्यंत अनेक स्ट्रीट लाईट, मोठे दिवे चोरीस गेले असून, हे प्रकार आसपासच्या परिसरातील स्थानिक चोर व गुन्हेगारी टोळ्यांच्या संगनमताने होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. विशेष म्हणजे, काल रात्री चोरटे एक संपूर्ण हाय मास्टर सेट श्रीपूर-D19 महात्मा फुले चौक बोरगाव येथे, पुलाजवळील (सहा दिव्यांचा) खाली उतरवत असताना, अचानक रोड वरून वाहने आल्यामुळे ते साहित्य तसंच टाकून पळून गेले आहेत. येणाऱ्या काही दिवसात जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर सर्व दिवे चोरीला जातील.
ठेकेदार व प्रशासनाचे ढिसाळ धोरण उघड
या गंभीर प्रकारांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
- अनेक ठिकाणी सर्विस रोडच्या स्ट्रीट लाईट्स व ब्रिज लाईट्स गेल्या आठवड्यापासून बंद आहेत.
- नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही ना दुरुस्ती केल्या जातात, ना तपासणी केली जाते.
- ठेकेदारांचा देखभालीवरील निष्काळजीपणा, संबंधित विभागाचा व अधिकाऱ्यांचा धाक नसल्यामुळे असे घडत आहे.
सुरक्षा व्यवस्था ढासळलेली – टोल वसुली मात्र सुरूच
याच रोडवरील पुणे हद्दीमधील सराटी टोल नाका येथे मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जात असतानाही महामार्गावर सुरक्षा बंदोबस्त नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. महाळुंग डांगेवस्ती येथे एकाच ठिकाणी अनेक वेळा अपघात सत्र सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी कोणताही बंदोबस्त केला जात नाही. त्या ठिकाणी अपघात क्षेत्र घोषित करावे अशी नागरिकांनी मागणी देखील केलेली आहे. अपघात होऊ नयेत म्हणून कायमचा बंदोबस्त करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु वारंवार पाठपुरावा करून देखील नॅशनल हायवेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे जीव गेल्यानंतर याची जबाबदारी हे संबंधित अधिकारी स्वीकारणार आहेत का? असा सवाल प्रवासी आणि नागरिकांमधून विचारला जात आहे आणि नाराजी व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी पोलीस आणि नॅशनल हायवेच्या सुरक्षा गार्डच्या गस्त चा अभाव असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत.
- चोरट्यांना अटकाव करणारी कोणतीही ठोस उपाययोजना नाही.
नागरिकांचा इशारा – दिवे वाचवायचे असतील तर कारवाई करा
स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना, फिरायला जाणाऱ्या अनेक नागरिकांनी, प्रवाशांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
हाय मास्टर दिव्यांच्या चोरीची सखोल चौकशी करावी
संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी
रात्रीच्या गस्तीत तातडीने वाढ करावी
सर्व बंद लाईट्स त्वरित सुरू कराव्यात
चोरीला गेलेल्या ठिकाणी तात्काळ नवीन लाईट्स बसविण्यात यावेत
जर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर “पालखी मार्गावरील एकही दिवा शिल्लक राहणार नाही,” असे मत येथील स्थानिक नागरिक, प्रवाशांनी व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारला आहे.
तुम्हीच ठरवा – टोल घेतला जातो, पण संरक्षण कोण देणार?
पुढील अपडेटसाठी वाचा – इन महाराष्ट्र न्यूज
संपादक: दत्ता नाईकनवरे