लोखंडी गजाआडही बहरला रक्षाबंधनाचा सण | जेलच्या भिंतीतही उमटले राखीचे बंध | #Rakhi |
बंदीजनांच्या डोळ्यांत आनंदाश्रू | अवगुण सोडून नवजीवनाची दिशा – राखीच्या बंधनातून प्रेरणा

पत्रकार शोभा वाघमोडे यांचा जेलमध्ये आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा
अकलूज प्रतिनिधी – संजय लोहकरे
माळशिरस मध्ये संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना, माळशिरस उपकारागृहात यंदा एक वेगळीच भावस्पर्शी रक्षाबंधन (Rakshabandhan) पाहायला मिळाले. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या शोभा वाघमोडे यांनी ५४ बंदीजनांच्या मनगटावर प्रेम व विश्वासाचे बंधन म्हणून राख्या (Rakhi) बांधल्या आणि त्यांना केवळ सणाचा आनंदच नाही, तर जीवनात नवी दिशा मिळवण्याची प्रेरणाही दिली.
रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहिणीचा सण नसून, तो विश्वास, जिव्हाळा आणि जबाबदारी यांचे प्रतीक आहे. याच भावनेतून वाघमोडे यांनी जेलमध्ये जाऊन बंदीजनांशी संवाद साधला. “जुने अवगुण, चुकीचे मार्ग सोडून नव्या जीवनाची सुरुवात करा,” असे त्यांनी आवाहन केले. त्यावेळी अनेक बंदीजनांच्या डोळ्यांत पाणी आले, अनेकांनी मनातील खंत व्यक्त केली, तर काहींनी बाहेर जाऊन नव्या उमेदीनं जगण्याचा शब्द दिला.
बंदीजनांच्या व्यथा
या संवादादरम्यान अनेक बंदीजनांनी आपले अनुभव व वेदना मांडल्या. काहींनी सांगितले की, आयुष्यातील क्षणिक चुकांमुळे ते येथे आले आणि त्याची शिक्षा ते रोज भोगत आहेत. काहींनी आपल्या कुटुंबियांची आठवण काढत डोळे पुसले. “आज बहीण नसतानाही, तुमच्या राखीने आम्हाला घरची आठवण झाली,” असे एका बंदीजनाने सांगितले. आणखी एकाने, “बाहेर गेल्यावर पुन्हा कधी गुन्ह्याच्या वाटेवर जाणार नाही,” अशी शपथ घेतली.
या सोहळ्यात माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ, तुरुंग अधिकारी जी. एस. खैरे यांच्या परवानगीने पोलीस हवालदार गणेश हांगे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार उपस्थित होते. प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.,
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारा, संस्कृती जपणारा हा रक्षाबंधनाचा उपक्रम माळशिरस जेलमधील सर्वांसाठी एक अविस्मरणीय आठवण ठरला.