रेणुका देवीची यात्रा सेक्शन 14 जांभूड-मिरे येथे उत्साहात साजरी
मंदिरासमोरील सभा मंडपासाठी निधी केला मंजूर

श्रीपूर तालुका माळशिरस जांभूड-मिरे,सेक्शन 14 येथे रेणुका देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणामध्ये उत्साहात संपन्न झाली. दोन दिवस विविध कार्यक्रम झाले. यात्रेदिवशी सकाळी देवीची पूजा व दुपारी पालखी मधून गावाला फेरी मारून देवीची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका देवीची यात्रा ‘उदो ग आई उदो’ च्या गजरात, पिपाणी ढोल ताशांच्या गजरात, भंडार्याची उधळण करीत उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडली.
सेक्शन 14 येथे गेल्या अनेक वर्षापासून हेमाडपंती रेणुका मातेचे पुरातन मंदिर होते. परंतु दुर्लक्षामुळे त्याची पडझड झालेली होती. ग्रामस्थ विनोदभाऊ साळुंखे-शिवसेना उपविभाग प्रमुख खडकवाला पुणे, हनुमंत खरात, राणू भाग्यवंत यांनी सदर मंदिराचे पुनर् बांधकाम केले. त्यामुळे सर्व भाविक भक्तांची दर्शनाची व यात्रेची चांगल्या प्रकारे सोय झाली आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैय्या बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते यात्रे दिवशी देवीची महाआरती करण्यात आली. माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून सदर मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी निधी मंजूर केल्याचे रणजीत भैय्या बबनराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी भाविक भक्तांनी रणजीत भैया शिंदे यांचा सत्कार केला. तसेच जांभूड ग्रामपंचायतचे सरपंच राहुल खटके व मिरे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय बाबर यांनी देखील रणजीत शिंदे यांचा ग्रामपंचायत मार्फत सत्कार केला.
मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी, खाद्य पदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्याचा आस्वाद घेण्यास भाविक दंग झाले होते.