महाराष्ट्र

अकलूज, प्रभाग ८ मध्ये तात्काळ कृती : गटार जाम समस्या सोडवून नगरसेवक महेश शिंदेंची कार्यतत्परता

जनतेच्या विश्वासातून जबाबदारी : महेश दादा शिंदेंकडून स्वच्छता आणि सुविधा अभियान

प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या सोडवली – महेश दादा शिंदे

अकलूज | दि. १४ (प्रतिनिधी)
“नगरसेवक म्हणून खुर्चीवर बसण्यापेक्षा नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे मला अधिक महत्त्वाचे वाटते,” अशा भावना व्यक्त करत अकलूज नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नूतन नगरसेवक महेश दादा शिंदे यांनी जनतेच्या सेवेला आपले पहिले प्राधान्य असल्याचे दाखवून दिले.

अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक ८ मधील माने–पाटील इंडस्ट्री परिसरात एचडीपी (HDP) पाईपलाईनच्या कामामुळे गटार पूर्णतः जाम झाले होते. सांडपाण्याचा निचरा बंद झाल्याने रस्त्यावर पाणी साचत होते. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि ये-जा करताना होणारा त्रास यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अनेक दिवसांपासून त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनी अखेर ही व्यथा नगरसेवक महेश दादा शिंदे यांच्याकडे मांडली.

नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत, “हे माझे कर्तव्य आहे” या भावनेतून महेश दादा शिंदे यांनी त्वरित दखल घेतली. त्यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधत कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. केवळ सूचना देऊन न थांबता, स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून गटार स्वच्छतेचे काम पूर्ण करून घेतले. काम पूर्ण होताच साचलेले पाणी वाहू लागले आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

याचबरोबर नवीन बाजारतळ परिसरातील गटारांचीही स्वच्छता करून घेण्यात आली. प्रभागातील प्रत्येक भागात दर आठवड्याला नियमित गटार स्वच्छता व्हावी, जेणेकरून पुन्हा नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये, अशा स्पष्ट सूचना नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

काही ठिकाणी हे काम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीने काम केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल महेश दादा शिंदे यांनी मनापासून आभार मानले.

यावेळी बोलताना महेश दादा शिंदे म्हणाले, “माझ्या प्रभागातील जनतेने मला नगरसेवक म्हणून निवडताना केवळ पद दिलेले नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकाच्या अडचणीत उभे राहणे आणि त्यांच्या समस्या स्वतः लक्ष घालून सोडवणे हाच माझा खरा धर्म आहे. प्रभाग क्रमांक ८ स्वच्छ, सुरक्षित आणि राहण्यायोग्य ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”

नगरसेवक शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्पर कृतीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “आमच्यासाठी धावून येणारा नगरसेवक मिळाला,” अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!