श्रीपूरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात आगमन | विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ,शाहूनगर-श्रीपूर
गौरी-गणपती सजावटीच्या साहित्याने सजली श्रीपूरची बाजारपेठ; भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतोय

श्रीपूर : दत्ता नाईकनवरे- संपादक इन महाराष्ट्र न्यूज
श्रीपूर (तालुका माळशिरस) येथे गणरायाचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय आणि उत्साहमय वातावरणाने भारून गेले. विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ (शाहूनगर श्रीपूर) च्या गणपती मंडळाची मिरवणूक यावर्षी जोरदार गाजली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून श्रीपूरची बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने आणि गणेश मूर्तीने गजबजलेली होती. सकाळपासूनच ग्राहकांची लगबग सुरू होती. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण घरगुती गणपतीसाठी मूर्ती विक्रेत्यांकडे गर्दी करत होते. यंदा सहा इंचांपासून सात फूट उंचीच्या आकर्षक, रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या वेशभूषेतील मूर्ती ग्राहकांसाठी उपलब्ध होत्या.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मोठ्या जल्लोषात मूर्तींचे स्वागत केले. ढोल-ताशे, पिपाणी, हलगी, दिमडी आणि फटाक्यांच्या गजरात गणेश मूर्ती चौकातून मिरवत आपल्या मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली. गावोगावी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला.
बाजारपेठांमध्ये गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होते. रंगीबेरंगी पडदे, रेशमी कुंच्या, फुलांच्या माळा, रांगोळी, लायटिंगच्या माळा आणि फळांची दुकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झळकत होती. या साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
घराघरात गणपतीचे आगमन झाले. भक्तांनी जयजयकार करत गणरायाचे स्वागत केले. प्रत्येक घरी पारंपारिक पद्धतीने पूजा, आरती पार पडली. गोड मोदकाचा नैवेद्य दाखवून गणेशाची आराधना करण्यात आली. गणेशोत्सवामुळे संपूर्ण श्रीपूर मध्ये भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाने नटलेला दिसून येत आहे.