महा ई सेवा व आधार केंद्र बंद (संप) | गावातील नागरिकांच्या गैरसोयी
संपाचा परिणाम-बंद मुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात

दत्ता नाईकनवरे संपादक इन महाराष्ट्र न्यूज
श्रीपूर / प्रतिनिधी: राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांच्या तीन दिवसीय राज्यव्यापी संपाचा परिणाम सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यातील सर्व गावांवर तसेच (पूर्व) परिसरातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. विविध शासकीय प्रमाणपत्रे, आधार अद्ययावत कामे, शेतकरी नोंदणी, वृद्धापकाळ व सामाजिक योजनांचे अर्ज आदी कामांसाठी नागरिक दररोज या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र केंद्र बंद राहिल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात असहकार आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शासनाने वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या मानधनवाढ, सेवा दर, प्रशिक्षण व तांत्रिक समस्या निराकरणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, असा आरोप केंद्रचालकांनी केला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच लाभार्थी वर्ग या तिन्ही दिवसांत ई-सेवा केंद्र बंद असल्याने गावातील बँकिंग, दस्तऐवज पडताळणी, प्रमाणपत्रे, आरोग्य योजना, पिक नोंदणी आदी कामांसाठी दररोज चकरा मारत आहेत. काहींना आधार अपडेट किंवा शासकीय कागदपत्रांसाठी दुसऱ्या गावात जावे लागत असून त्यातून वेळ व खर्च दोन्ही वाढले आहेत.
स्थानिक नागरिकांनी शासनाला आवाहन केले आहे की, “महा ई सेवा केंद्रांमार्फतच सामान्य माणसाला शासनाच्या योजना प्रत्यक्ष मिळतात. त्यामुळे ही सेवा खंडित होणे म्हणजे नागरिकांसाठी अडचणींचा डोंगर आहे.”



