पाणी पळवापळवी रोखण्यासाठी पाणीवापर संस्थांची नोंदणी वाढवावी : रणजितसिंह मोहिते-पाटील
कामती येथे उजनी पाणी नियोजनावर मोहिते पाटील कुटुंबीयांचा शेतकऱ्यांशी संवाद

उजनी धरणाचे पाणी शेतकऱ्यांनी आरक्षित करणे गरजेचे – रणजितसिंह मोहिते पाटील
कामती (प्रतिनिधी):
उजनी धरणावर अवलंबून असलेल्या मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी मौजे कामती येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणी नियोजनाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
सध्या उजनी धरणावर सुमारे १०० हून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. परंतु पुढील वर्षी धरणातील तब्बल ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात जाणार असून यंदाच्या डिसेंबर अखेरीस २ टीएमसी पाणी घाटणे बंधाऱ्यात सोडले जाणार आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची कमतरता आणखी गंभीर होणार आहे. याशिवाय समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने भीमा नदी व कालव्याला पाणी सोडण्यावर मर्यादा येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, पाण्याची पळवापळवी रोखणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच पाणी आरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक पाणीवापर संस्थांची नोंदणी करून पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी शेतकऱ्यांनी स्वीकारावी, असे त्यांनी आवाहन केले.
या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तसेच श्री. वसंतनाना देशमुख, मनोहर भाऊ डोंगरे, बाबासाहेब शिरसागर, अनिल सावंत, राजशेखर पाटील, अस्लम चौधरी, विनय पाटील, दीपक गायकवाड, सीमाताई पाटील, मानाजी बापू माने, कामतीचे सरपंच प्रवीण भोसले, डॉ. सर्वळे, अच्युत पाटील, रणजित चवरे, ॲड. पवन गायकवाड, विजय कोकाटे, विजय बुरकुल, शिवशंकर कावचळे, भारत पाटील, काशीनाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.