डॉ. यशवंत कुलकर्णी यांना “सर्वोत्तम कामगिरी” पुरस्कार जाहीर
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशनकडून डॉ. कुलकर्णी गौरवले जाणार

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कारखान्याची साखर उद्योगात राज्यस्तरीय दखल, सोलापूरच्या सहकारी साखर चळवळीला पुण्यात मोठा मानाचा बहुमान
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना साखर उद्योगांमधील सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा मानाचा पुरस्कार पुणे येथील आघाडीची संस्था “दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन इंडिया” तर्फे जाहीर झाला असून, पुरस्कार वितरण सोहळा २२ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्मा अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, एसटीएआय अध्यक्ष संजय अवस्थी व एसआयएसएसटीए अध्यक्ष एन. चिन्नप्पन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. कुलकर्णी यांच्या या यशामागे मोठे मालक यांचे आशीर्वाद आणि सोलापूर जिल्ह्याचे मा. आ. प्रशांत परिचारक मालक यांचे मार्गदर्शन असल्याचे कारखान्यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पुरस्काराने श्रीपुर तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची राज्य पातळीवर दखल घेतली गेली आहे.