सर्प विज्ञान कार्यशाळेत विद्यार्थ्यांना साप हाताळणीचे प्रशिक्षण
उंदरांवर नियंत्रण ठेवणारा साप पर्यावरणाचा राखणदार – प्रा. देशमुख

फक्त चारच विषारी, उर्वरित साप निरुपद्रवी : जनजागृती उपक्रम अकलूजात
दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अकलूजात सर्प विज्ञान कार्यशाळा संपन्न
साप हाच शेतकऱ्यांचा खरा मित्र – प्रा. धनंजय देशमुख
अकलूज (केदार लोहकरे) :
“साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून पर्यावरण साखळीत त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असे प्रतिपादन सर्पमित्र प्रा. धनंजय देशमुख यांनी केले. अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यप्रसिद्धी सप्ताहांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व सर्प विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जनार्दन परकाळे होते. प्रा. देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निसर्गाच्या दृष्टीने सापाचे योगदान महत्त्वाचे आहे. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचे प्रमाण कमी करण्याचे काम साप करतात. प्रत्यक्षात भारतात आढळणाऱ्या पन्नासहून अधिक सापांपैकी फक्त चारच विषारी असतात, उर्वरित साप हे निरुपद्रवी असतात. त्यामुळे साप मारू नयेत, अशी जनजागृतीही त्यांनी केली.
यावेळी सर्पदंश झाल्यास घ्यावयाची खबरदारी, विषारी व बिनविषारी दंश ओळखण्याची पद्धत, तसेच विद्यार्थ्यांना साप हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
डॉ. परकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय मगर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. सज्जन पवार, प्रा. स्मिता पाटील, डॉ. विजयकुमार शिंदे, प्रा. रोहित कुंभार, प्रा. विनायक माने, डॉ. रविराज माने, प्रा. विनायक सूर्यवंशी यांसह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.