माळेवाडी(बो.) येथे हायवे वर भीषण अपघात; ग्रामस्थांचा संताप उसळला
दररोज जीव धोक्यात – माळेवाडी(बो.) परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेसाठी एकजूट

“बोगदा करा नाहीतर मतदान नाही” – माळेवाडी ग्रामस्थांचा नॅशनल हायवेला इशारा
छोटा हत्ती व दुचाकीचा भीषण अपघात; महामार्ग प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष
नॅशनल हायवेवरील अपघातांची मालिका थांबणार का? ग्रामस्थांचा बोगद्याच्या मागणीवर ठाम निर्णय, माळेवाडी-बोरगाव येथे पुन्हा अपघात; ग्रामस्थांचा संताप, “बोगदा करा नाहीतर मतदान बहिष्कार”चा इशारा
माळेवाडी(बोरगाव) – संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग (NH-965G) वर माळेवाडी-बोरगाव येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकल आणि छोटा हत्ती (पिकअप) यांचा जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार माळेवाडी (बो.) वरून बोरगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी श्रीपूरहून तोंडले-बोंडले-पंढरपूरच्या दिशेने जाणारा छोटा हत्ती वेगाने येत असताना हा अपघात घडला. या भीषण धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला असून, अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या ठिकाणी गेले अनेक दिवस ग्रामस्थ, शाळकरी मुले आणि वाहनधारक जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. कारण, माळेवाडीच्या ग्रामस्थांना बोरगावला बाजार ला जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. माळेवाडी आणि D19 खंडाळी या गावातील लोकांना बोरगाव येथे ये-जा करण्यासाठी या व्यस्त महामार्गावरून जावे लागते. या मार्गावर दररोज हजारोच्या संख्येने वाहने वेगाने धावत असल्याने ग्रामस्थांना सतत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
माळेवाडी(बो.) ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा नॅशनल हायवे पंढरपूर कार्यालयाकडे “या ठिकाणी बोगदा किंवा उड्डाणपूल उभारावा” अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारींकडे आणि निवेदनांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
माळेवाडी (बो.) सरपंच सीमा संभाजी कुदळे यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला. पण नॅशनल हायवे ऑफिसकडून सहकार्य मिळत नाही. रोज शाळकरी मुले, स्थानिक नागरिक,महिलांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. आता आमच्या गावाने ठरवलंय — जर बोगदा झाला नाही, तर आम्ही मतदानाला बहिष्कार टाकू!”
गावकऱ्यांचा रोष इतका तीव्र आहे की, आता “रस्ता उकरा किंवा बंद करा” असा घोषवाक्यांसह एकजूट आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची मालिका लक्षात घेता, संबंधित महामार्ग प्राधिकरणांनी तातडीने उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.