भारतीय लोकशाहीचा उत्सव : राज्यातील ३६ जिल्ह्यांत संविधानाचे सांस्कृतिक दर्शन
सावंतवाडीत संविधानाची गाथा — दोन दिवस रंगणार सांस्कृतिक सोहळा

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना
मुंबई, दि. १३ ऑक्टोबर :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये “गौरवगाथा संविधानाची” या शीर्षकाखाली संविधानाचा सन्मान करणारे विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मार्गदर्शन सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे लाभले आहे. संविधानाच्या या स्मरणीय वर्षात कलाकारांना त्यांच्या कलेतून लोकशाहीच्या मूल्यांचा गौरव मांडण्याची संधी मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅरीस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे दिनांक १५ व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हे दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
पहिल्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी सायं. ६.३० ते १०.०० या वेळेत “राष्ट्रग्रंथ – आधारस्तंभ लोकशाहीचा” हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित, कुमार सोहोनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाईल.
तर १६ ऑक्टोबर रोजी त्याच वेळी “गौरवगाथा संविधानाची” हा लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात प्रतिक जाधव, विजय कर्जावकर, पूजा सावंत आणि सहकारी कलाकार सहभागी होणार आहेत.
रसिक प्रेक्षकांनी या दोन दिवसांच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी केले आहे.