महाराष्ट्र

राम सातपुते तालुक्यात अराजकता निर्माण करत आहेत – के.के. पाटील

समविचारी पक्षांची तिसरी आघाडी – सातपुते विरोधात तालुक्यात एकजूट

अकलूज : सोलापुरातील लोकसभा निवडणुकीनंतर परत आलेले भाजपचे खासदार राम सातपुते हे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचे खोटे सांगून भाजप तसेच विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते के.के. पाटील यांनी केला.

संगम (ता. माळशिरस) येथील मंगल कार्यालयात रविवारी तालुक्यातील भाजप व समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांची तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस भाजपचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (शिंदे गट), मनसे, भारतीय दलित महासंघ, प्रहार, रयत शेतकरी संघटना आदी प्रमुख राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात अतुल सरतापे, किशोर सुळ, सत्यजित सपकाळ, बाळासाहेब धाईंजे, अजित बोरकर, शहाजी पारसे, दिगंबर मिसाळ, दादा लोखंडे आदी मान्यवरांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचा प्रारंभ

बैठकीचे प्रास्ताविक सागर इगळे यांनी केले. त्यानंतर स्वागतपर भाषण करताना मुख्य आयोजक व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश इंगळे म्हणाले की, “राम सातपुते प्रा.लि. ही कंपनी तालुक्यातील भाजप संपवायला निघाली आहे. सातपुते हे तालुक्यातील वाल्मीक कराड होऊ पाहत आहेत. ते अवैध धंदेवाल्यांना घेऊन गाड्यांमधून फिरतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात आणि कार्यक्रमात येऊ नका म्हणून फोन करतात. इतकेच नव्हे तर मंगल कार्यालय मालकांना देखील दबाव आणून जागा देऊ नका असे सांगतात. त्यामुळे तालुक्यात अराजकता निर्माण झाली आहे.”

के.के. पाटील यांचा घणाघात

यानंतर भाषण करताना ज्येष्ठ नेते के.के. पाटील यांनी थेट राम सातपुते यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, “भाजप वाढत असताना आमचे नेहमीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या दाखल्यांच्या अडचणी निर्माण व्हायच्या. त्यावेळी मीच श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून सातपुते यांना उमेदवार केले. मात्र सातपुते यांना आणणे ही माझीच चूक ठरली, हे आज मान्य करतो. त्यांना मिळालेले १ लाख ८ हजार मते ही तालुक्यातील भाजप व समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाची पावती होती. परंतु त्यांच्या वागण्यामुळे आज असंतोष वाढला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आमच्या पक्षात ‘राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि मी तृतीय’ हा मंत्र आहे. पण आता हा मंत्र उलटा वाचावा लागत आहे. पोलीस, गुंड पाठवणे, धमक्या देणे, दोन नंबरवाल्यांना घेऊन फिरणे हे तालुक्यात चालणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळेच ते लोकांना कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून फोन करतात, कार्यालयांना फोन करून दडपण आणतात आणि कार्यक्रमात गुंड पाठवतात. त्यांच्या या वागण्यानेच सर्व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.”

ॲड. सोमनाथ वाघमोडे यांचे भाष्य

या वेळी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनीही तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही प्रस्थापितांविरोधात लढतो आहोत. परंतु कधीही खालच्या पातळीवर राजकारण केले नाही. मात्र गेल्या पाच-सात वर्षांत बाहेरून आलेल्या लोकांनी तालुक्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. स्थानिक विरोधकांना बदनाम करण्याचे प्रकार, खोटे फोन करून धमक्या देणे असे प्रकार सुरू झाले आहेत. हे आम्ही चालू देणार नाही. म्हणूनच आज सगळे समविचारी पक्ष एकत्र आले आहेत.”

कार्यक्रमात गोंधळ

महेश इंगळे यांचे भाषण सुरू असताना अचानक एका व्यक्तीने व्यासपीठावर गोंधळ घातला. “माझे तुझ्याकडे गेल्या १३ वर्षांचे पैसे आहेत, ते आत्ताच दे” असे म्हणून त्याने इंगळे यांना अडवले. या प्रकारामुळे कार्यक्रम काही वेळ विस्कळीत झाला. मात्र व्यासपीठावरील नेत्यांनी त्याला गोड बोलून बाहेर काढले आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.

उपस्थित मान्यवरांचे विचार

यावेळी भिमराव भुसनर, अप्पासाहेब कर्चे, राहुल ढेरे, सुरेश पवार, राहुल बिडवे, अजित बोरकर, ॲड. प्रशांत रूपनवर, प्रा. अजित पारसे, दादा लोखंडे, प्रा. सतिश कुलाळ आदींनीही आपले विचार मांडले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!