गणेशगाव खून प्रकरण | अकलुज पोलिसांची झपाट्याने कारवाई | आरोपी दोन तासांत गजाआड
अकलुज पोलिसांची चोख कामगिरी | संतोष वाघला अटक |

अनैतिक संबंधांच्या संशयातून खून; अकलुज पोलिसांची जलद कारवाई
अकलूज, माळशिरस तालुका, २० जून २०२५ :
गणेशगाव (ता. माळशिरस) येथे झालेल्या एका हृदयद्रावक खून प्रकरणात अकलुज पोलिसांनी केवळ दोन तासांत आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
माहितीनुसार, दिनांक १९ जून रोजी रात्री ९ ते २० जूनच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे (वय ६०, रा. गणेशगाव) हे त्यांच्या शेतातील नव्या बांधकाम असलेल्या बंगल्यात झोपले असताना, संतोष बाळासाहेब वाघ (रा. लवंग, ता. माळशिरस) याने सिनप्पा वाघमोडे आणि शेतमजूर महिलेच्या अनैतिक संबंधाचा संशय घेऊन धारदार शस्त्राने डोक्यावर, छातीवर, हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली.
या घटनेबाबत बाळु सिन्नाप्पा वाघमोडे (वय ४०, रा. गुळवेनगर, अकलुज) यांनी अकलुज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गु.र.नं. ४४७/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व अकलुज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विक्रम साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पोलिसांची दोन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. सपोनि चौधरी, सपोनि लंगुटे, पोहे. स्वप्नील गायकवाड, सुहास क्षीरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाडगे, राजेंद्र ठोंबरे, बागाडे, सलगर, पोकॉ मारकड, तुका माने, प्रविण हिंगणगावकर, सोमनाथ माने आणि चालक महादेव जाधव, शरद आगलावे, बबलु गाडे यांच्या अथक प्रयत्नातून आरोपीस दोन तासांच्या आत अटक करण्यात आली.
आरोपी संतोष वाघ याने प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि गणेश चौधरी करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अकलुज पोलिसांची तत्परता व कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.