महाराष्ट्र

दारूच्या नशेत श्रीपूर पोलीस चौकीत हल्ला! फिर्यादी आणि पोलिसांना आरोपीने केली मारहाण

पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई — दारूड्या आरोपीला अटक

फिर्यादी आणि पोलिसांना मारहाण, श्रीपूर पोलीस चौकीतील साहित्याची तोडफोड आणि धमक्या
‘मला अटक करून दाखवा!’ — आरोपीचा चौकीत गोंधळ

आज आरोपीला कोर्टात हजर करून, सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल प्रतिनिधी

श्रीपूर (ता. माळशिरस) : दारूच्या नशेत एका इसमाने थेट श्रीपूर पोलीस चौकीत शिरून फिर्यादीवर आणि पोलिसांवरच हल्ला केला, सरकारी वर्दीला धरून धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि चौकीतील साहित्याची तोडफोड केली! एवढंच नव्हे तर अंगावरील कपडे काढत “मला अटक करून दाखवा, मी तुमच्यावर अँट्रॉसिटी लावतो” अशा धमक्या देत पोलिसांना आव्हान दिलं. हा संतापजनक प्रकार शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) संध्याकाळी 6 ते 7 सातच्या दरम्यान घडला असून आरोपी बाजीराव नेताजी भोसले (रा. महाळुंग, ता. माळशिरस) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार मनोज मोहन बागडे (अकलूज पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी पो.काँ. भिमराव देवकर हे श्रीपूर पोलीस दुरक्षेत्र येथे दैनंदिन कामकाज करीत असताना तक्रारदार महादेव साधु पवार (रा. लवंग) हे एका वादाविषयी तक्रार देण्यासाठी चौकीत आले होते. त्याचवेळी आरोपी बाजीराव भोसले हे दारूच्या नशेत चौकीत आले आणि पवार यांच्याशी शिवीगाळ करत हातात दांडका घेऊन त्यांच्या डोक्यावर प्रहार केला.

महादेव पवार हे जमिनीवर कोसळल्यावर पोलिसांनी मध्ये पडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने, पोलीस कर्मचारी बागडे आणि देवकर यांच्या अंगावरील सरकारी ड्रेसची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर आरोपीने चौकीतील खिडक्या, पडदे, खुर्च्या यांची तोडफोड केली.

दारूच्या नशेत तो “तुम्ही मला अटक करून दाखवा! मी तुमच्यावर अँट्रॉसिटी लावतो!” असे आरडाओरड करत पोलिसांना धमकावत राहिला. चौकीतील वातावरण तणावपूर्ण झाल्याने अकलूज पोलीस ठाण्यातील अंमलदारांना कळवून अतिरिक्त पथक घटनास्थळी मागवण्यात आले. पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आणि त्यांच्या पथकाने ताबडतोब श्रीपूर येथे घटनास्थळाला भेट दिली. नंतर पोलिसांनी सरकारी वाहनातून आरोपीला अकलूज पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणी केली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी नोकराला मारहाण, सरकारी संपत्तीचे नुकसान, धमक्या, शिवीगाळ आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला कोर्टात हजर करून, सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. किशोर गायकवाड करीत आहेत. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!