श्रीपूर | ब्रिमा सागर कारखान्यातील कामगाराचा मुलगा झाला कर निरीक्षक! – रोहित क्षीरसागरची यशोगाथा
ब्रिमा सागर महाराष्ट्राच्या कामगारपुत्राने मिळवले एमपीएससीत यश, डायरेक्टर भरतकुमार सेठिया कडून रोहितचा गौरव

“रोहितने जिद्द आणि कष्टातून मिळवले यश!” — डायरेक्टर भरतकुमार सेठिया
श्रीपूर प्रतिनिधी (दत्ता नाईकनवरे)
श्रीपूर : तालुका माळशिरस येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड या कारखान्यातील कामगाराच्या मुलाने “जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न हेच यशाची गुरुकिल्ली आहे,” हे दाखवून दिलंय, श्रीपूर येथील ब्रिमा सागर कारखान्यातील कामगार शामराव क्षीरसागर यांचा चिरंजीव रोहित शामराव क्षीरसागर याने, अथक परिश्रमांच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत कर निरीक्षक (Tax Inspector) पदावर यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे, गावाचे तसेच कारखान्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल रोहित क्षीरसागर यांचा ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड, श्रीपूर या कारखान्याच्यावतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर होते, तर प्रमुख उपस्थिती डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांची होती. कार्यक्रमात रोहित क्षीरसागर यांचा त्यांच्या वडिलांसह श्री. शामराव क्षीरसागर व आई सौ. लक्ष्मी क्षीरसागर यांचा हार, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना डायरेक्टर भरतकुमार सेठिया म्हणाले, “रोहितने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून प्रामाणिक प्रयत्न आणि शिस्तबद्ध अभ्यास करून हे यश मिळवले आहे. कामगाराच्या मुलाने अशी प्रगती साधणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे यश इतर सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”
त्याचप्रमाणे डी. बी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “रोहितचे यश हे सर्व कामगारांसाठी अभिमानाचे आहे. मेहनती व सामान्य कुटुंबातील तरुणांनीही चिकाटी ठेवल्यास मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
या वेळी डेप्युटी मॅनेजर नरेश पाठक, सतीश डिंगरे, निवृत्ती पवार, डी. बी. कुलकर्णी, सत्यजित पाटील, भागवत पारसे, सुरज शिंदे, गणेश विभुते, उमेश मिसाळ, रोहन क्षीरसागर, राम क्षीरसागर, महादेव जाधव, दावल शिवशरण, नितीन वाघमारे, आण्णा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रोहितचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले, तर शेवटी सत्यजित पाटील यांनी आभार मानले.
 
					


