महाराष्ट्र

महाळुंग डांगे वस्तीमध्ये मध्यरात्री चोरी, कपाट उचकून सोन्याचे दागिने केले लंपास

₹63 हजारांचे सोन्याचे दागिने चोरी

महाळुंग डांगे वस्तीमध्ये मध्यरात्री घरफोडी, महाळुंग अकलूज रोड लगत असणाऱ्या मुंडफणेवस्ती व जाधववस्ती येथे देखील अज्ञात चोरटे दिसल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी देखील चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

उघड्या दरवाजातून चोरट्यांची घरात घुसखोरी; डांगे वस्तीतील कुटुंबाला मोठा धक्का. अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अज्ञात चोरट्याने रात्रीतच दागिने केले लंपास

महाळुंग (ता. माळशिरस) येथील नॅशनल हायवेलगत असलेल्या डांगे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरीला नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जावेद पैगंबर डांगे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, एफआयआर क्रमांक 0764 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी जावेद डांगे (वय 40, व्यवसाय – ड्रायव्हर व शेती, रा. डांगे वस्ती, महाळुंग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याची शक्यता आहे. रात्री कुटुंबासह जेवण करून सर्वजण झोपले होते.

घराच्या दरवाज्याची कडी नीट बसत नसल्याने दरवाजा पुढे करून झोपण्यात आले. पहाटे 4 वाजता उठल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. तत्काळ तपास केला असता बेडरूममधील कपाट उघडे दिसून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले.

कपाटातील लॉकर उघडे असल्याचे दिसले. त्यातून सोन्याचे नेकलेस, गलसर व मणी असे एकूण ₹63,000 किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले. कुटुंबीयांनी घर व परिसरात शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीत.

चोरी गेलेल्या दागिन्यांचे तपशील पुढीलप्रमाणे :

  1. सोन्याचे नेकलेस — 11 ग्रॅम वजन — किंमत ₹50,000 
  2. सोन्याचे 10 मणी — 3 ग्रॅम वजन — किंमत ₹10,000 
  3. सोन्याचे गलसर — 1 ग्रॅम वजन — किंमत ₹3,000 

अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असताना घरामध्ये प्रवेश करून मुद्दाम लबाडीने ही चोरी केल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. अकलूज पोलिसांनी जागेची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

तसेच याच रात्री महाळुंग अकलूज रोड लगत असणाऱ्या मुंडफणेवस्ती व जाधववस्ती येथे देखील अज्ञात चोरटे दिसल्याची माहिती मिळाली आहे. मुंडफणेवस्ती येथे चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न घरातील व्यक्ती जागे झाल्यामुळे  फसला, तर जाधववस्ती येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!