श्रीपूर-बोरगाव नॅशनल हायवे 965G वर अपघाताचा थरार; ट्रॅक्टरचे झाले तुकडे, ट्रक चेमटून गेला
वाहतुकीत वाढ आणि निष्काळजीपणा; भीषण टक्कर, मोठे नुकसान

ऊस ट्रॅक्टर आणि अशोक लेलँड ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात; दोघेही गंभीर जखमी, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक
संपादक : दत्ता नाईकनवरे,इन महाराष्ट्र न्यूज
श्रीपूर तालुका माळशिरस : नॅशनल हायवे 965G, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बोरगाव हद्दीत मंगळवारी पहाटे साधारण तीनच्या सुमारास ऊस ट्रॅक्टर आणि अशोक लेलँड 14 चाकी ट्रक यांचा भीषण समोरा समोर अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर चालकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घटना कशी घडली?
पंढरपूर–तोंडले बोंडले–श्रीपूर दिशेने येणारा नवीन ऊस ट्रॅक्टर दोन भरलेल्या ट्रॉल्यासह विरुद्ध दिशेने येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. याच वेळी पुणे-इंदापूर–माळीनगर–महाळुंग येथून पंढरपूरकडे जात असलेला लोखंडी जॉब वाहतूक करणारा अशोक लेलँडचा 14 चाकी ट्रक (क्र. MH46CL 8951) या दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार धडक बसली.
ट्रॅक्टरचे झाले तुकडे; विनाशकारी दृश्य
अपघात इतका भीषण होता की नवीन ट्रॅक्टरचे अक्षरशः चार तुकडे झाले. गिअर, बॅटरी, लोखंडी भाग, टायर यांचे तुकडे रस्त्यावर 20 ते 25 फुटांपर्यंत विखुरले. ट्रॅक्टर नवीन आहे. ट्रॅक्टरला नंबर प्लेटही नसल्याचे आणि त्याची केवळ चौथी ऊस खेप होती, असे स्थानिकांनी सांगितले.
त्याचबरोबर दोन्ही ट्रॉल्याही उलटून त्यांचेही प्रचंड नुकसान झाले. ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेमटला असून वाहनाचा कॅबीन भाग मोडून आत घुसला आहे.डेरिंगचे देखील तुकडे झाले आहेत.
जखमींची माहिती
- पवन पंडित जाधव (26), रा. सिद्धेवाडी ता. पंढरपूर – ऊस ट्रॅक्टर मालक चालक (गंभीर जखमी)
- सुनील सिद्धेश्वर चव्हाण (29), रा. मंगळवेढा – अशोक लेलँड ट्रक चालक (जखमी)
ट्रॅक्टर मालकाला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तर ट्रक चालकाला सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हृदयद्रावक दृश्य — चपातीचे गठुडं, विखुरलेला ऊस व लोखंडी तुकडे
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाच्या घरून दिलेल्या चपातीचे भाकरीचे गठुडं बाजूला पडलेले दिसले. ट्रॅक्टरची दोन चाके जवळपास 20 फुटावर फेकली गेली होती. ट्रॅक्टरमधील भरलेला ऊस देखील पूर्णपणे ट्रकच्या कॅबिनवर व खाली कोसळला होता. दोन्ही वाहने एकमेकात अक्षरशः घुसलेली दिसत होती.
वाहतूक नियमांचे पालन अत्यावश्यक
या हायवेवर सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच या मार्गावरून 100 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाड्या धावत असतात. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अशा अपघातांची शक्यता वाढते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



