कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्यात संविधान दिन उत्साहात साजरा
डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांचे माहितीपूर्ण भाषण; संविधान मूल्यांचा जागर

सहकारी साखर उद्योगात संविधान दिन साजरा
[दत्ता नाईकनवरे, संपादक-इन महाराष्ट्र न्यूज]
श्रीपूर ता.माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याच्या शेतकरी भवनात आयोजित कार्यक्रमात कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
संविधान दिनानिमित्त बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, “भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वोत्तम संविधान देशाला बहाल केले.” त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत झाले व २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले.
प्रत्येक घटकाला समान न्याय, हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य देत देशाची अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी संविधानात नमूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “भारतीय लोकशाही सुदृढ आहे कारण इथे कर्तव्य आणि अधिकार यांचा समतोल राखणारी मूल्ये संविधानात कोरली गेली आहेत,” असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
पत्रकार प्रकाश केसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास गाडे आणि पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनीही कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. सहकारी साखर उद्योगात संविधान दिन पहिल्यांदा साजरा केला आहे. याबद्दल श्रीपूर परिसरात सकारात्मक चर्चा होत आहे. अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण भाषणासाठी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी डॉ. कुलकर्णी यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी मानले.



