दुपारच्या वेळेतच चोरी; बोरगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बोरगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून मौल्यवान वस्तू लंपास

🔴 बोरगाव (ता. माळशिरस) येथे भरदुपारी घरफोडी; चांदी व रोख रक्कम लंपास
बोरगाव, ता. माळशिरस येथील रहिवासी सिताराम सुखदेव घळके (वय ६९) यांच्या राहत्या घरात भरदुपारी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घळके यांनी घराला कुलूप लावून शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून लॉकरमध्ये ठेवलेली पाव किलो चांदीची मौल्यवान वस्तू तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल लंपास केला. ही चोरी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.
घळके कुटुंबात एकूण पाच सदस्य असून, घटनेच्या वेळी घरातील दोन व्यक्ती शेतात गेलेल्या होत्या. कुटुंबातील मुले शाळेत गेली होती, तर त्यांच्या सुनबाई नांदोरे येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने घर पूर्णतः बंद होते. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी केली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच कुटुंबाच्या घरासमोर बांधलेल्या चार शेळ्या रात्रीच्या वेळी चोरीस गेल्या होत्या. त्या घटनेची फिर्याद श्रीपूर येथील पोलीस चौकीत दाखल करण्यात आली होती. मात्र त्या चोरीचा तपास पूर्ण होण्याआधीच दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने घळके कुटुंब भयभीत झाले आहे. अद्याप याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली नाही.
भरदुपारी झालेल्या या चोरीमुळे बोरगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



