पांडुरंग साखर कारखान्याचा विक्रम; एका दिवसात १०,००८ मेट्रिक टन ऊस गाळप
चेअरमन प्रशांतराव परिचारक व MD डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग कारखान्याची ऐतिहासिक कामगिरी शेतकरी, कामगारांच्या मेहनतीला यश; पांडुरंग साखर कारखान्याचा नवा विक्रम

पांडुरंग कारखान्याचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ दिवस
पांडुरंग साखर कारखान्याने गाळपात रचला इतिहास; एका दिवसात १०,००८ मेट्रिक टन ऊसाचे गाळप
(संपादक – दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज)
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गाळप क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. कारखान्याने एका दिवसात तब्बल १०,००८ मेट्रिक टन ऊस गाळप करत आजपर्यंतचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
“एका दिवसात १०,००० पेक्षा अधिक मेट्रिक टन ऊस गाळप” ही कारखान्याच्या इतिहासातील अभूतपूर्व कामगिरी ठरली असून, यामुळे पांडुरंग साखर कारखान्याचे नाव राज्यातील आघाडीच्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये अधोरेखित झाले आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट नियोजन व काटेकोर व्यवस्थापनामुळे हा विक्रमी गाळपाचा टप्पा यशस्वीपणे गाठता आला. कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, अभियंते व कुशल कामगार यांच्या सामूहिक मेहनतीचे हे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या विक्रमी गाळपाबाबत माहिती देताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप, यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन आणि कर्मचारी वर्गाची तत्परता यामुळे हा विक्रम शक्य झाला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आणखी चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”
दरम्यान, या ऐतिहासिक यशाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाच्या प्रतिक्रिया उमटत असून, कारखाना प्रशासनाचे, चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे सर तसेच एम.डी. डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेतकरी, सभासद, कर्मचारी, ठेकेदार, आणि नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.



