महाराष्ट्र

शुभविवाहाच्या नव्या परंपरेची सुरुवात : प्रतीक आणि कादंबरी चा आदर्श शुभविवाह

“साधेपणात सौंदर्य: प्रतीक आणि कादंबरीचा विवाह ”

श्रीपूर, ३ जून २०२५ : (दत्ता नाईकनवरे) 

बोरगाव तालुका माळशिरस येथील व श्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुखदेव साठे व कांचन साठे यांचे चिरंजीव प्रतीक आणि नववधू कादंबरी यांनी सध्या समाजात लग्न समारंभ म्हणजे मोठ्या खर्चाचा, ढोलताशांचा आणि भव्यदिव्य सजावटींचा भाग मानला जातो. मात्र, प्रतीक आणि कादंबरी या नवविवाहित जोडप्याने या पारंपरिक रूढींना छेद देत एक वेगळीच आणि आदर्शवत दिशा समाजासमोर ठेवली आहे.

साठे आणि मोरे परिवाराने साखरपुडा कार्यक्रमाचे आयोजन कादंबरीच्या गावामध्ये आयोजित केले होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी त्यांनी फक्त जवळचे नातेवाईक आणि काही मित्र-मैत्रिणींनाच आमंत्रित केले होते. अनावश्यक खर्च, मोठे हॉल्स, फॅन्सी जेवण, सजावट यासारख्या गोष्टी टाळून त्यांनी साखरपुड्यानंतर लगेचच विवाह साधे पद्धतीने करण्याचा  प्रस्ताव  आई-वडील आणि पाहुण्यांपुढे मांडला.  आणि सर्वांनी यास एक मताने मंजुरी दिली आणि एक साधा, पण अत्यंत हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण विवाह सोहळा पार पाडला. या विवाहाच्या निर्णयासाठी दूरध्वनीवरून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी लग्न सोहळ्यासाठी शुभेच्छा देऊन अनमोल मार्गदर्शन केले.

यावेळी प्रतीकने सांगितले,, “लग्न हे दोन मनांची आणि कुटुंबांची एकजूट असते, खर्चाची झगमगती स्पर्धा नव्हे. आम्हाला आमचा दिवस खास बनवायचा होता, पण त्यासाठी लाखो रुपये उधळणे आवश्यक नाही असं मला वाटलं आणि मी कादंबरी पुढे हा प्रस्ताव ठेवला आणि  कादंबरीने आणि तिच्या आई-वडिलांनी सहमती दर्शवली आणि विवाह सोहळा संपन्न झाला.”

अशा पद्धतीने विवाह करण्यामागे केवळ खर्चाची बचत हा हेतू नव्हता, तर पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी याचाही विचार होता. या नव्या विचाराने भरलेल्या आणि साधेपणात सुंदरतेचा आदर्श ठरलेल्या प्रतीक आणि कादंबरीच्या विवाहाचे अनेकांनी कौतुक केले असून, ही प्रेरणादायी घटना समाजात नवीन विचारांना चालना देणारी ठरली आहे.

साखरपुड्यानंतर लगेचच विवाह सोहळ्यासाठी कादंबरीचे आई-वडील सौ.संगीता व पोपट मोरे आणि प्रतीकचे  आई-वडील सौ.कांचन व सुखदेव साठे आणि उपस्थित सर्व पाहुणे मित्रांनी एकमताने या विवाह सोहळ्यासाठी मान्यता दिली आणि हा काळाची गरज असलेला विवाह सोहळा गोरज मुहूर्ता वरती आनंदी वातावरणामध्ये अनगर तालुका मोहोळ येथील छोट्या लग्न हॉलमध्ये साध्या विधीनुसार पार पडला. नंतर हॉलमध्ये जवळच्या लोकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

“फाजील खर्चाला रामराम: एका वेगळ्या विचाराचा विवाह सोहळा”

विशेष म्हणजे, या निर्णयामागे केवळ प्रतीक आणि कादंबरी नव्हते, तर त्यांच्या कुटुंबीयांची आणि मित्रमंडळींचीही पूर्ण सहमती होती. कादंबरीचे आई-वडील आणि प्रतीकचे आई-वडील या दोन्ही कुटुंबांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. यावेळी कादंबरीचे वडील म्हणाले, “आजवर बरीच लग्नं पाहिली, पणमाझ्या मुलीच्या लग्नात जे शांततेने आणि समाधानाने अनुभवायला मिळालं, ते कुठेच मिळालं नाही.” यावेळी प्रतीकीची आई म्हणाली, “मुलांनी जेव्हा हा प्रस्ताव सांगितला, तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. खरोखरच, एकत्रितपणे घेतलेला निर्णय अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण आहे.”

या निर्णयामध्ये दोघांच्या मित्रमंडळींचाही मोठा सहभाग होता. एकत्र येऊन त्यांनी संपूर्ण आयोजनात पाठबळ दिलं, कोणताही तणाव न आणता संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पाडला. मित्रमंडळींच्या सहकार्याने आणि दोन्ही कुटुंबांच्या पाठिंब्याने प्रतीक आणि कादंबरीचा विवाह केवळ एक विवाह समारंभ न राहता, एक सामाजिक संदेश देणारी प्रेरणादायी घटना ठरली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!