मुंडफणेवाडी शाळेत बाल वारकरी दिंडी सोहळा रंगला
बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.

श्रीपूर: वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात मुंडफणेवाडी शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
महाळूग (ता. मळशिरस) येथील मुंडफणेवाडी जिल्हा परिषद शाळेतर्फे बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते. दिंडीमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नऊवारी साडी परिधान करून, डोईवर छोटेसे तुळशी वृंदावन घेऊन आणि पांढऱ्या शुभ्र वेशात कपाळाला बुक्का लावून निघालेले छोटे वारकरी, त्यांच्या मुखातून दुमदुमणारा विठू माऊलीचा नामगजर निमित्त होते. आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या बालवारीचे त्यानंतर पंढरीच्या वारीतील रिंगणाप्रमाणे बालवारकऱ्यांनी देखील रिंगण तयार केल्याने, जणू काही बाल वारकऱ्यांचा जथ्था पंढरपूरच्या दिशेने माऊलींचा जयघोष करीत जात असल्याचे चित्र उपस्थितांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. आषाढी एकदशीचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती फेरी काढली. स्वच्छताविषयक प्रबोधन फलक, प्लास्टिक हटावचा नारा देत दिंडी निघाली. यावेळी शाळेसमोरून महिपती महाराजांची पालखी जात असते त्या सर्व वारकऱ्यांना शाळेच्या वतीने मुलांनी घरून आणलेली भाकरी व मिरच्यांचा ठेचा देण्यात आला.त्यामुळे सर्व वारकऱ्यांना आनंद झाला.शाळेने राबविलेल्या या उपक्रमामुळे सर्व वारकरी भारावून केले. तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सुद्धा भाकरी व मिरच्यांचा ठेचा आणून दिला होता. तसेच वारकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था सुद्धा चंद्रसेन चव्हाण यांनी केली होती. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी परिसरातील अनेक पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते .हा पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर व सहशिक्षिका अर्चना वाघ तसेच अंगणवाडी सेविका रेखा मुंडफणे व मदतनीस सोनाली मंडले यांनी परिश्रम घेतल.