महाराष्ट्र

स्वारगेट S.T. बसस्थानकात तरुणीवर बसमध्ये बलात्कार | आरोपी चे नाव मिळाले.

पोलिसांची आठपथके रवाना | आरोपीच्या भावाला चौकशीसाठी घेतले ताब्यात

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट एस.टी. बसस्थानकात आज पहाटे साडेपाच वाजता एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. त्यावेळी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या सराईत गुन्हेगाराने तिला चुकीची माहिती देऊन, बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वीही शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. स्वारगेट बसस्थानकातील या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एक २६ वर्षाची तरुणी आपल्या फलटण गावी जाण्यासाठी निघाली होती, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले. थोड्याफार अंधाराचा त्याने घेतला गैरफायदा, त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी इकडे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. 

बसच्या दरवाजाला लॉक नव्हते, बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. 

सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी दिसून आला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

पहाटे सकाळी  गजबज असलेल्या बस स्थानकावरती पुण्यामध्ये असा प्रकार घडल्याने महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दत्तात्रय रामदास गाडे  ( अंदाजे वय 35  वर्षे. रा. शिक्रापूर)  असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुंड आहे. पाटील म्हणाल्या, पीडित तरूणी पुण्यात नोकरी करते. तरूणी स्वारगेट बस स्थानकातून सकाळी 5.30 ते 5.45 दरम्यान फलटणला जात होती. बसची वाट पाहत असताना आरोपी पीडित तरूणीच्या शेजारी बसल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. पीडित तरूणीच्या शेजारील माणूस उठून गेला. त्यानंतर आरोपी पीडित तरूणीशी बोलला आहे. तिच्याशी गोड-गोड बोलून आधी ओळख करून घेतली. कुठे जातेय ताई, असे आरोपीने पीडितेला विचारले. मला फलटणला जायचे आहे, असे तरूणीने सांगितले. सातारची बस इथे नाही, तिकडे लागली आहे, असे आरोपीने पीडितेला सांगितले.

त्यावर पीडित म्हणाली, बस इथे लागत असल्याने मी बसली आहे. आरोपी म्हणाला, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडीत तरूणी आरोपी गेल्याची दिसत आहे. तिथे गेल्यावर, बसमध्ये अंधार आहे, असा प्रश्न तरूणीने केला. त्यावर, ही रात्रीची उशिराची बस असल्याने प्रवाशी झोपलेले आहेत. तू बसमध्ये जाऊन चेक करू शकतेस, असे आरोपीने सांगितले. तरूणी बसमध्ये जाताच आरोपीही गेला आणि बसचा दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपीने पीडित तरूणीवर लैंगिक अत्याचार केला आहे, असे पाटील यांनी सांगितले. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!