श्रीपूरची ऋतुजा जाधव विभागीय वेटलिफ्टिंग विजेती – राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
वजन उचलण्यात श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूरची ऋतुजा ‘हेवीवेट’ विजेती ठरली

१२५ किलो वजन उचलून ऋतुजा जाधवची राज्यस्तरीय स्पर्धेत झेप
श्रीपूरच्या ऋतुजा जाधव ने वेटलिफ्टिंगमध्ये गाजवला विभागीय किताब
श्रीपूर प्रतिनिधी
श्रीपूर (ता. माळशिरस) : श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा शहाजी जाधव हिने पुणे विभागीय वजनउचल स्पर्धेत (वेटलिफ्टिंग) प्रथम क्रमांक पटकावत गावाचे नाव अभिमानाने उजळवले आहे.
ही स्पर्धा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाली. १७ वर्ष वयोगटातील ६९ किलो वजन गटात ऋतुजाने तब्बल १२५ किलो वजन उचलून आपली ताकद दाखवली आणि विभागीय विजेतेपद पटकावले.
या कामगिरीनंतर ऋतुजाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ती स्पर्धा नाशिक-मनमाड येथे पार पडणार आहे.
तिच्या या यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज देशमुख, तसेच प्राचार्य पांडुरंग बनसोडे, उपप्राचार्य सुनील गवळी, पर्यवेक्षक सिताराम गुरव, संस्था पर्यवेक्षक सुहास शेंडे, ज्येष्ठ लिपिक हनुमंत मोरे यांनी अभिनंदन केले. तसेच क्रीडा शिक्षक विजयकुमार केचे, शामराव धाराव, मोहसीन शेख, करुणा धाईंजे यांनी मार्गदर्शन केले होते. सर्व स्तरातून ऋतुजाचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
श्रीपूरच्या या कन्येने याआधीही भालाफेक जिल्हास्तरीय प्रथम, कुस्तीत सलग दोन वर्ष विजेतेपद, तसेच हॅमर थ्रोमध्ये विभागीय द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे गावात व परिसरात अभिमान व आनंदाचे वातावरण आहे.