गणित विषयाचा शिक्षक नसल्याने 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
श्रीपूर येथील ज्यु.कॉलेजला गणित विषयाचा शिक्षक नाही, विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

बारावीच्या गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान
सर्व वर्तमानपत्रांना जाहिरात देऊन, ताबडतोब शिक्षकांच्या मुलाखती घेऊन गुणवंत, गणित विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करावी अशी पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी वेगवेगळ्या विभागांमध्ये शिक्षण घेत आहेत. गेले पंधरा दिवसापासून सायन्स विभागांमध्ये गणित विषयाचा शिक्षक नसल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत अकरावी व बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुज्ञ जागरूक पालकांनी व विद्यार्थ्यांनी, शिक्षक पालक संघाशी संपर्क साधला आहे, याबाबत तक्रार देखील दिली आहे. याबाबतीत कॉलेज प्रशासनाला विचारले असता, संस्था, कॉलेज व संबंधित असणारा पूर्वी गणित विषय शिकवीत असणारा शिक्षक यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे दिसून येत आहे. इयत्ता बारावीचे वर्ष हे पुढील शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे वर्ष मानले जाते. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या मार्कांवरती पुढचे प्रवेश आधारित असतात. जर गणितासारख्या अवघड विषयाचे शिक्षक या कॉलेजमध्ये नसतील तर संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे. या नुकसानाला कोण जबाबदार? असा पालकांमधून प्रश्न विचारला जात आहे.
अकरावी आणि बारावी गणित विषयाचे विद्यार्थी याबाबत लवकरच प्राचार्यांना निवेदन देणार आहेत तर पालक सुद्धा याबाबतीत शाळेमध्ये जाब विचारण्यासाठी येणार आहेत. गेल्या काही वर्षापासून गणित विषयाचे एक शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत होते, ते चांगल्या प्रकारे गणित विषय शिकवत आहे असे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. परंतु संस्था व ज्युनियर कॉलेज प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे सदर शिक्षक गेले पंधरा दिवसापासून कॉलेजमध्ये येत नाहीत.
तरी ज्युनियर कॉलेज व संस्था प्रशासनाने ताबडतोब गणित विषयाची सर्व वर्तमानपत्रांना जाहिरात देऊन, ताबडतोब नवीन येणाऱ्या शिक्षकांच्या मुलाखती घेऊन गुणवंत, कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक करावी. अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांमधून होत आहे.



