फुले फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी नवोदित कवी शुभम गोरे व कवयित्री स्नेहल गोरे
फुले-विचारांच्या प्रसारासाठी पुण्यात चार दिवसीय आंतरराष्ट्रीय कवी संमेलन

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी अकलूजच्या पती-पत्नी कवी दाम्पत्याची निवड
अकलूज (केदार लोहकरे) —
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील नवोदित कवी शुभम किरण गोरे आणि कवयित्री सौ. स्नेहल शुभम गोरे या पती-पत्नीची निवड करण्यात आली आहे.
हा चार दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव दि. २, ३, ४ व ५ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन समाजभवन येथे आयोजित करण्यात येणार असून, याबाबतची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
या फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील तसेच परदेशातील कवींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. निवड झालेल्या कवींना फेस्टिव्हलदरम्यान आपल्या कविता सादर करण्याचे व्यासपीठ मिळणार आहे.
या मानाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अकलूज येथील शुभम गोरे व स्नेहल गोरे यांची निवड झाल्याने अकलूज शहराच्या साहित्य क्षेत्राला विशेष सन्मान मिळाला आहे. निवड झालेल्या कवींनी दि. २ जानेवारी २०२६ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विजय वडवेवार यांनी केले आहे.
कवी शुभम किरण गोरे
वयाच्या अवघ्या १३व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात केलेल्या शुभम गोरे यांनी सुरुवातीला शेरोशायरी व चारोळी या प्रकारात लेखन केले. पुढे कवितेचा छंद जोपासत त्यांनी मैत्री, प्रेम, नाती, निसर्ग व विरह अशा विविध विषयांवर प्रभावी कविता साकारल्या.
त्यांच्या कविता विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये व दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. “आयुष्यभराची नाती” हा त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.
त्यांना सोलापूर येथे काव्य शिरोमणी पुरस्कार तर हैद्राबाद येथे राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.— शुभम किरण गोरे (कवी),अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
कवयित्री सौ. स्नेहल शुभम गोरे
लग्नानंतर पतीच्या प्रेरणेतून कविता लेखनाची आवड निर्माण झालेल्या स्नेहल गोरे यांनी चारोळीपासून आपल्या लेखनाची सुरुवात केली.
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलसारख्या मानाच्या साहित्य महोत्सवात अध्यक्षपदाची जबाबदारी आणि कविता सादरीकरणाचे भाग्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पतीची साथ आणि सासरच्या कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. — सौ. स्नेहल शुभम गोरे (कवयित्री),अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर



