श्रीपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत | Shreepur
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
श्रीपूर परिसरात भटक्या कुत्र्यासह, एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत निर्माण केली आहे. परिसरात रस्त्यावरुन जात असताना पिसाळलेले कुत्रे इतर कुत्र्यांच्या व नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे.
सोमवारी सायंकाळी श्रीपूर छत्रपती शिवाजी चौकामध्ये हा कुत्रा फिरत होता, त्याच्या अंगावरती इतर मोकाट कुत्री जात होती. पिसाळल्यामुळे हा कुत्रा कुणीकडेही पळत होता. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली आहे. हा कुत्रा पांढऱ्या रंगाचा असून तो मोठा आहे. कुत्रा अंगावर येत असल्यामुळे नागरिक इतरत्र चाव्याच्या भीतीने पळत होते.
श्रीपूर परिसरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या ग्रुपचा वावर दिसून येत आहे. ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी हे कुत्रे मोठमोठ्याने भुंकत व रडत आहेत व येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागत आहे. त्यामुळे दुचाकी चालवत असताना दुचाकीस्वाराचा पुढे धडक बसून अपघात होण्याची शक्यता असून, नागरिक या पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहेत.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
श्रीपूर येथील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, वाहन पार्किंग स्थळा लगत, अंतर्गत गल्यांमधून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, मॉर्निंग वॉकला जाताना, कामानिमित्त इतरत्र स्थानिक नागरिक येत जात असताना, या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास होत आहे. छत्रपती शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महाळुंग रोड, भाजी मंडई, बोरगाव रोड, व इतर स्थानिक गल्लीमध्ये मोकाट कुत्रे फिरत असल्यामुळे, सर्वांना त्याचा नाहक त्रास होत आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. खासगी ठेकेदार नेमून त्याच्या मार्फत कुत्रे पकडून ते गावाच्या बाहेर सोडावेत व श्वान निर्बिजीकरण मोहीम हाती घ्यावी. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीने तात्काळ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.