महाराष्ट्र

शाळेची घंटा वाजली आणि आठवणी जाग्या झाल्या | १९७६ च्या तुकडीचा सुवर्ण मेळावा श्रीपूरात रंगला

पन्नास वर्षांनी पुन्हा एकत्र — श्री चंद्रशेखर विद्यालयाचा सुवर्ण स्नेहमेळावा भावनिक वातावरणात

श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर – इयत्ता दहावी १९७६ च्या तुकडीचा सुवर्ण स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

दत्ता नाईकनवरे-संपादक, इन महाराष्ट्र न्यूज (9421075931)

श्रीपूर (ता. माळशिरस) — श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर येथील इ. दहावी (सन १९७६) च्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण स्नेहमेळावा ९ नोव्हेंबर रोजी जुन्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावनिक व उत्साही वातावरणात संपन्न झाला. पन्नास वर्षांपूर्वी एकत्र शिकलेले व मैत्रीच्या नात्याने घट्ट जोडलेले हे जुने विद्यार्थी-विद्यार्थिनी आज पुन्हा एकत्र आले आणि आपल्या शाळेतील त्या सुवर्ण क्षणांचा आनंद अनुभवला.

शाळेच्या प्रांगणात जमल्यानंतर प्रार्थना वेळची घंटा वाजली आणि त्या निनादात गतकाळातील स्मृतींनी मन भारावले. ज्या वर्गात बसून शिक्षण घेतले, त्याच वर्गात सर्वांची प्रतीकात्मक हजेरी घेण्यात आली. त्या क्षणी “हजर आहे सर!” म्हणताना अनेकांच्या डोळ्यांत जुन्या शिक्षकांच्या आठवणी दाटल्या.

कार्यक्रमापूर्वी श्रीपूरचे आद्य प्रवर्तक व विद्यालयाचे संस्थापक वै. चंद्रशेखर आगाशे यांच्या पुतळ्यास सर्वांनी नतमस्तक होऊन वंदन केले. त्यानंतर शाळेच्या सभागृहात आयोजित मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षक ग. बा. कुलकर्णी यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून ग. गो. जोशी, सौ. अनुपमा पंडित, मोहन भगत, अनंत गुंडो कुलकर्णी,प्राचार्य पांडुरंग बनसोडे हे उपस्थित होते. सरस्वती पूजन व संस्थापकांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना अनेक गोड आठवणी शेअर केल्या. गंगाधर चिपळूणकर यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील शिक्षकांचे संस्कार, आदर्श व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते अमेरिकेत, जर्मनीत नोकरीच्या निमित्ताने गेल्याचे सांगून, “श्री चंद्रशेखर विद्यालयातील संस्कारांमुळेच जीवनात उंच भरारी घेता आली,” असे कृतज्ञतेने नमूद केले.

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माजी विद्यार्थिनी मुमताज इनामदार यांनी ओघवत्या आणि भावनिक भाषेत शाळेतील आठवणी सांगत सर्वांची मने जिंकली. त्यांनी आपल्या कार्यरत विभागातील अनुभव, उपक्रम आणि शिक्षणातील वाटचाल सुंदररीत्या मांडली.

या वेळी तत्कालीन शिक्षक शामला देशपांडे, शिला भागवत, दा. ना. आरळेकर, रेखी सर, सौ. मराठे बाई, दाबके बाई यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. अरुंधती देव चक्के यांनी गुरुजनांच्या संस्कारांचे आणि आदर्शांचे मनोवेधक वर्णन केले. त्यांच्या हृदयस्पर्शी कथनामुळे गतकाळ डोळ्यांसमोर उभा राहिला. कार्यक्रमात मनोगता मध्ये सांगताना सर्वांना हृदयस्पर्शी अनुभव दिला. अनेकांनी मान्य केले की, “आज आपण जे काही आहोत, ते श्री चंद्रशेखर विद्यालयानेच शिकवलं आहे.”

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीपाद (भाऊसाहेब) कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, गंगाधर चिपळूणकर, शौकत शेख, विष्णू माने, गुडुलाल शेख, गौतम आठवले, किशोर बेंबळकर, व स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्राचार्य पांडुरंग बनसोडे यांनी शाळेची सद्यस्थिती, प्रगती आणि आव्हाने यावर सविस्तर माहिती दिली. “शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या शाळांचे बोर्ड मानांकन रद्द केले जाईल,” असे सांगत त्यांनी आर्थिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

माजी शिक्षक ग. बा. कुलकर्णी, ग. गो. जोशीसौ. अनुपमा पंडित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शशिकांत कुलकर्णी यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून गं. बा. कुलकर्णी, ग. गौ. जोशी, अनुपमा पंडित, सध्याचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे, पत्रकार बी. टी. शिवशरण, महादेव जाधव, दत्तात्रय नाईकनवरे, शांतीलाल रेडे, सुखदेव साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बॅचेचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल पन्नास  वर्षानंतर शाळेत आलेले, एकमेकांना काहीजण भेटलेले, बरेच जन सेवानिवृत्त झालेले, आजोबा झालेले, साधारण वयोगट 65 नंतरचे  सर्व माजी विद्यार्थी  मेळाव्यात सहभागी झाले होते.

भावनांनी भारलेल्या या सुवर्ण मेळाव्यात, पन्नास वर्षांचा प्रवास आठवत सर्वांनी “पुन्हा भेटू या!” अशा शब्दांत निरोप घेतला. हा दिवस श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशी भावना सर्वांच्या मनात होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!