गणेशगांवच्या प्रतीक्षा ठोंबरेची वैद्यकीय क्षेत्रात गरुडझेप यश | MBBS | Ganeshgaon
प्रतिक्षाचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रेरणा देत आहे

आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक प्रयत्न, जिद्द आणि चिकाटीने यश खेचून आणले व तीने आई वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले
अकलूज (प्रतिनिधी केदार लोहकरे यांजकडून) गणेशगाव (ता.माळशिरस) येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उषा रामचंद्र ठोंबरे यांची कन्या डॉ.प्रतीक्षा उषा रामचंद्र ठोंबरे यांनी रशियामध्ये सहा वर्ष राहून एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च डिग्री संपादन करून आपला व गावाचा जिल्ह्यामध्ये नावलैकीक मिळवला आहे.
सन २०१८-१९ पासून २०२३-२४ पर्यंत एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले व भारतात वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी भारतीय वैद्यकीय बोर्डाने निर्धारित केलेली परीक्षा म्हणजेच एफएमजीई ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पुर्ण केले आहे. दिवसातील १५ ते १६ तास अभ्यास करीत उत्कृष्ठ गुण मिळवून भारतात डॉक्टर म्हणून कार्य करण्यासाठी योग्यतेचे प्रमाणपत्र पहिल्या प्रयत्नांच्या जोरावर मिळविले आहे. माळशिरस तालुक्यातील गणेशगांव हे दिड हजार लोकसंख्येचे गाव असून येथील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. एका शेतकरी आई वडिलांचा चेहरा व त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक प्रयत्न करून जिद्द आणि चिकाटीने यश खेचून आणले व तीने आई वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. लेकीने गगन भरारी घेण्यासाठी तिच्या पंखांना बळ देण्याचे काम आई वडिलांना केले आहे. लेकीचे हे यश पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कोरोना काळात बिकट प्रसंग ओढवला असतानाही आई वडिलांची खंबीर साथ दिली व तिच्या स्वप्न पूर्तीसाठी ती प्रेरक ठरली. प्रतिक्षाचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रेरणा देत आहे. सध्या पंचक्रोशीत सर्वत्र तिच्या या यशाचा बोलबाला आहे. तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रतीक्षा आता सज्ज झाली आहे.
प्रतीक्षाचे जिल्हा परिषद शाळा टेंभुर्णी येथे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल,टेंभुर्णी येथे तर अंबड येथील विठ्ठलराव शिंदे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण झाले आहे.