महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतून महिलांना नवी दिशा | अकलूजमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम | लोकायत लोकसंचलित साधन केंद्र

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जागृतीचा संदेश देत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लोकायत लोकसंचलित साधन केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे)

महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या लोकायत लोकसंचलित साधन केंद्र, अकलूज यांच्या वतीने क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कश्मिरा लोहकरे (रत्नपारखी) तसेच लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा व अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगरसेविका सौ. प्रतिभा गायकवाड उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर “इतनी शक्ती हमे देना दाता” ही सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.

लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडून समाजाला परिवर्तनाची दिशा दिली, असे नमूद केले. त्यांच्या कार्यामुळेच आज मुली शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, असे त्यांनी सांगितले.

यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. कश्मिरा लोहकरे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यासोबतच उपस्थित महिलांना आरोग्य विषयक माहिती देत हेल्थ, स्किन व हेअर केअर संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यकारिणी सदस्य जयमाला सगर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले, तर लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सौ. कामिनी ताटे-देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांचा सविस्तर इतिहास उपस्थितांसमोर मांडला.

या कार्यक्रमास लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या सचिव संगीता गडदे, तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, CRP, क्षेत्र समन्वयक, लेखापाल व व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बालविवाह रोखण्याबाबत सामूहिक शपथ घेत सामाजिक जबाबदारीचे भान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!