शाळेत जात असलेल्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला अटक, श्रीपूर परिसरात संताप
रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पालक व मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे आरोपी गजाआड
“थांब नाहीतर मारून टाकीन” म्हणत विद्यार्थिनीला ऊसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न; अकलूज पोलिसांची तात्काळ कारवाई
शाळेच्या वाटेवर, चौकात रोड रोमिओचा हैदोस; विद्यार्थिनीच्या धाडसाने आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुख्याध्यापक व पालकांच्या सतर्कतेमुळे तात्काळ गुन्हा दाखल, तात्काळ निर्भया पथक शाळेत दाखल, अकलूज पोलिसांची जलद कारवाई
श्रीपूर | प्रतिनिधी
श्रीपूर ता.माळशिरस महाळुंग मायनर परिसरात शाळेत जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 24 जून) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0454 अन्वये दाखल करण्यात आला असून आरोपी जीवन घाडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशाला, श्रीपूर येथे शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे महाळुंग मायनर ते श्रीपूर रस्त्याने पायी शाळेत जात होती. यावेळी आरोपी जीवन घाडगे हा दुचाकीवरून तिच्या मागे आला व रस्त्यात गाडी थांबवून तिला बोलण्याचा बहाणा करत अडवले.
पीडितेने शाळेला उशीर होत असल्याचे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला धमकावत जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर तिच्या खांद्यावर हात ठेवून अश्लील वक्तव्य केले. तसेच तिचा विनयभंग करून तिला जबरदस्तीने रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घाबरलेल्या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घर गाठले. त्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पुढे शाळेत गेल्यानंतर तिने हा प्रकार श्री चंद्रशेखर विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांना सांगितला.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांनी तात्काळ विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधला. तसेच शाळा प्रशासनानेही कठोर भूमिका घेत विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांना धीर देत तत्काळ निर्भया पथक अकलूज आणि अकलूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023- 74, 75, 351 (2), बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२- 8, “बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण-12- अधिनियम, २०१२ वरील कलमास अनुसरून आरोपी वरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. निर्भया पथकाच्या प्रमुख पीएसआय करिष्मा वनवे मॅडम, अकलूज पोलीस ठाणे कडील सपोनी वाघमोडे, सपोनि टेंगले, एएसआय समाधान देशमुख, पोहेका किशोर गायकवाड, पोहेका समीर पठाण, पोहेका शिवाजी परांडे, पोहेका सलगर, पोका रणजित जगताप, पोका जयंत माळी, भाऊसाहेब मारकड यांच्या दोन टीम तयार करून रात्रीत उजडण्यापूर्वी आरोपी जीवन जयंत घाडगे रा, मायनर महाळुंग याचा शोध घेऊन अटक केले आहे. गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पीएसआय करिष्मा वनवे मॅडम करीत आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. विद्यार्थिनीने दाखवलेले धाडस, कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा आणि श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशासनाने घेतलेली तात्काळ भूमिका यामुळे आरोपीविरुद्ध वेगाने कारवाई होऊ शकली, अशी प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.

