महाराष्ट्र

श्रीपूरमध्ये अतिक्रमणमुक्त जागेच्या सुशोभीकरणाला वेग; व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठी योजना

अतिक्रमणानंतर व्यापाऱ्यांना दिलासा! कॅनॉलवर गाळे उभारण्यासाठी प्रयत्न होणार – राहुल रेडे

अतिक्रमणमुक्त जागेच्या सुशोभीकरणाला वेग; व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठी योजना

कॅनॉलवर व्यापारी गाळे उभारण्यासाठी प्रयत्न करणार – गटनेते राहुल रेडे

श्रीपूर | प्रतिनिधी

श्रीपूर (ता. माळशिरस) येथील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत अतिक्रमण हटविल्यानंतर आता त्या जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळत असून, त्याचबरोबर अतिक्रमणामुळे व्यवसाय गमावलेल्या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठीही महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते तथा महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते राहुल कुंडलिक रेडे यांनी संबंधित जागेच्या विकासाबरोबरच व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे प्रशासनाने हटविल्यानंतर अनेक छोटे व्यापारी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते व हातगाडीधारक यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नगरपंचायत व शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचे राहुल रेडे यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेचे आकर्षक सुशोभीकरण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निधीतून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून परिसराचे सुशोभीकरण, पादचारी सुविधा, हरित विकास आणि नागरिकांसाठी उपयुक्त सार्वजनिक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

याचबरोबर फळ व भाजी विक्रेत्यांसाठी नगरपंचायतीच्या मंडईतील उपलब्ध गाळ्यांचा योग्य वापर करून त्यांना व्यवसायासाठी सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्यापाऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागाकडून स्वतंत्र विकासनिधी मिळविण्याचाही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल रेडे यांनी पुढे सांगितले की, पालखी सोहळा संपल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, बारामती येथील सिंचन विभागाच्या कॅनॉलवर उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांच्या धर्तीवर श्रीपूरमध्येही मोठा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकदरम्यान भाटघर कॅनॉलवरती व्यापाऱ्यांसाठी नियोजित गाळे उभारण्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प साकार झाल्यास फक्त सध्या विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांनाच नव्हे, तर भविष्यातील व्यावसायिक गरजांनाही मोठा दिलासा मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सुशोभीकरणाच्या प्रस्तावित कामाची प्राथमिक पाहणी व मोजमाप करण्यासाठी आज संबंधित ठिकाणी सहाय्यक अभियंत्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि नगरपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आराखड्याबाबत नागरिकांशीही चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी गटनेते नगरसेवक राहुल रेडे, नगरसेवक निनाद पटवर्धन, शिवाजी रेडे, मारुती रेडे, विक्रम लाटे, त्रिंबक वाळेकर, विक्रांत रेडे, प्रताप लोंढे, बाळासाहेब भोसले, कौसर शेख, सतीश पवार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सुशोभीकरण, व्यापाऱ्यांचे पुनर्वसन आणि कॅनॉलवरील व्यापारी संकुलाचा प्रस्ताव या तिन्ही बाबी प्रत्यक्षात आल्यास श्रीपूरच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!