महाराष्ट्र

वॉचमन गेल्यानंतर चोरट्यांचा डाव यशस्वी | शाळेत झाली चोरी सीसीटीव्ही गायब

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये चोरी; पाच सीसीटीव्ही कॅमेरे व पाण्याची टाकी लंपास

वॉचमन गेल्यानंतर चोरट्यांचा डाव यशस्वी; 

अकलूज | प्रतिनिधी

अकलूज येथील यशवंतनगर परिसरातील शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत शाळेच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले पाच सीसीटीव्ही बुलेट कॅमेरे तसेच एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र पांडुरंग माने-देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शाळेच्या सुरक्षेसाठी एकूण १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यापैकी पाच कॅमेरे शाळेच्या बाहेरील बाजूस बसविण्यात आले होते. तसेच शाळेच्या टेरेसवर एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली होती.

८ जुलै रोजी सायंकाळी शाळा बंद करून सर्व कर्मचारी घरी गेले. रात्री ड्युटीवर असलेले वॉचमन पाय दुखत असल्याने सुमारे रात्री ९ वाजता घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळेतील वीज मीटरची तपासणी करताना वीजपुरवठ्याची वायर कापल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता बाहेरील बाजूस बसविण्यात आलेले पाचही कॅमेरे गायब असल्याचे दिसून आले. पुढे टेरेसवर पाहणी केली असता पाण्याची टाकीही चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये दोन हजार रुपये किमतीचे प्रत्येकी पाच बुलेट सीसीटीव्ही कॅमेरे (एकूण १० हजार रुपये) तसेच पाच हजार रुपये किमतीची एक हजार लिटरची पाण्याची टाकी असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात FIR 0488 भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अभिजित चंद्रकांत कुंभार करीत आहेत.

(इन महाराष्ट्र न्यूज)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!