महाराष्ट्र

अकलूजजवळ चौंडेश्वरवाडीत भरदिवसा गोळीबार; महिलेची हत्या, संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

डाळिंबाच्या शेतात थरार! महिलेच्या डोक्यात गोळी झाडून हत्या; आरोपी फरार

अकलूज, माळशिरस तालुक्यात खळबळ: शेतात पिस्तुलातून गोळी झाडून महिलेची हत्या; बीएनएससह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा.

साठे कुटुंब मूळचे माळखांबी येथील रहिवासी

अकलूज, ता. ६ : माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे सोमवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. उषा विजय साठे (वय ३५) यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात संशयित सचिन जगन्नाथ देशमुख (रा. चौंडेश्वरवाडी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्र अधिनियम तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, विजय सुदाम साठे हे पत्नी उषा, मुलगा तुषार यांच्यासह चौंडेश्वरवाडी येथे वास्तव्यास असून, गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात मजुरीचे काम करीत आहेत. सोमवारी सकाळी विजय साठे हे डाळिंब बागेवर औषध फवारणीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत शेतमालकांचा मुलगा सचिन देशमुख तसेच रतन आणि सागर हे मजूरही काम करीत होते.

दुपारी सुमारे एकच्या सुमारास उषा साठे या घराकडून शेताच्या दिशेने येताना दिसल्या. काही मिनिटांतच गोळीबाराचा आवाज आणि महिलेच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकू आल्याने विजय साठे व इतर कामगार घटनास्थळी धावले. शेतालगतच्या मोकळ्या जागेत उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. फिर्यादीनुसार, त्या वेळी संशयित सचिन देशमुख हा हातात पिस्तूल घेऊन उभा होता. जखमी महिलेच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

जखमी उषा साठे यांना तत्काळ वाहनातून अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेनंतर विजय साठे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सचिन जगन्नाथ देशमुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चौंडेश्वरवाडीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्येमागील कारण अद्याप गूढ

उषा साठे यांच्यावर गोळीबार करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध अंगांनी तपास करीत असून, फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे चौंडेश्वरवाडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!