महाराष्ट्र

श्रीपूरच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर; अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगवर कारवाईची गरज

पालखीपूर्वी अतिक्रमण हटणार? श्रीपूरमध्ये रस्ते मोकळे करण्याची नागरिकांची मागणी

श्रीपूर अतिक्रमणाच्या विळख्यात; बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत, कारवाईची नागरिकांची मागणी

श्रीपूर (ता. माळशिरस) : श्रीपूर गावाची लोकसंख्या आणि व्यापारी उलाढाल दिवसेंदिवस वाढत असताना गावातील रस्ते मात्र पूर्वीच्या क्षमतेचेच राहिल्याने वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ, भाटघर कालव्यालगतचा परिसर तसेच दुतर्फा रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालक, पायी चालणारे नागरिक व शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

श्रीपूरमध्ये दोन मोठे साखर कारखाने, विविध उद्योग-व्यवसाय तसेच कामगारांची वाढती वस्ती यामुळे दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकजण दुकाने, व्यावसायिक, दुकानासमोर तसेच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळते. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावतो, किरकोळ अपघात घडतात आणि वाहनांच्या धडकांवरून वादही निर्माण होऊन अनेक  मोठी भांडणे या ठिकाणी  झालेली आहेत. 

विशेषतः श्रीपूर ते अकलूज मार्गावरील भाटघर कालव्यालगतचा रस्ता हा पूर्व भागातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. साखर हंगामात ऊस वाहतूक, मालवाहतूक आणि प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महाळुंग-श्रीपूर मार्गे जात असल्याने लाखो वारकरी आणि हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नगरपंचायत, इरिगेशन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशानुसार आवश्यक ती अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ पालखी सोहळ्यापुरती अतिक्रमणे हटवून उपयोग होणार नाही. कायमस्वरूपी उपाययोजना करून बेकायदेशीर अतिक्रमणावर कठोर कारवाई करणे, नियोजित पार्किंग व्यवस्था उभारणे, वाहतूक पोलिसांकडून नियमित दंडात्मक कारवाई करणे आणि मुख्य रस्ते कायमस्वरूपी मोकळे ठेवणे आवश्यक आहे.

श्रीपूरच्या वाढत्या नागरीकरणाचा विचार करता भविष्यातील वाहतूक नियोजन, पार्किंग धोरण आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा वाढती गर्दी आणि अपघातांची मालिका रोखणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!