श्रीपूरदोन दिवसांवर पालखी सोहळा | अतिक्रमणमुक्त जागा अजूनही खड्डे, दगड आणि कचऱ्याने भरलेली
श्रीपूरमध्ये अतिक्रमण हटले; पण पालखी मार्गावर घाणीचे साम्राज्य, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पालखी मार्गावरील अतिक्रमण हटले; मात्र खड्डे, दगड व घाणीमुळे वारकऱ्यांची चिंता वाढली
पालखी सोहळ्यापूर्वी तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची मागणी
श्रीपूर | इन महाराष्ट्र न्यूज, संपादक-दत्ता नाईकनवरे
श्रीपूर (ता. माळशिरस) येथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार, दि. २१ जुलै रोजी बोरगाव मुक्कामी रवाना होणार असून, लाखो वारकरी आणि शेकडो दिंड्या श्रीपूर मार्गे जाणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर पालखी महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली असली, तरी त्यानंतर निर्माण झालेली अस्ताव्यस्त परिस्थिती वारकरी व नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत, सिंचन विभाग (इरिगेशन) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भाटघर कॅनॉललगतची अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र कारवाईनंतर त्या ठिकाणी पडलेले दगड, मोडतोड झालेल्या सिमेंट काँक्रीटचे अवशेष, तुटलेले ओटे, पत्र्यांचे तुकडे, कॅनॉलमध्ये साठलेला प्लास्टिक कचरा, चहाचे कप, खराब झालेले अन्न, तसेच मोठे खड्डे अद्यापही तसेच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, अतिक्रमण हटविताना जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत. चौकामध्ये बाजूला रस्त्यालगत पडलेले दगड आणि बांधकामाचा मलबा यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी अपघात होण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कॅनॉलमध्ये वर्षानुवर्षे साचलेला प्लास्टिक कचरा, अन्नाचे अवशेष आणि इतर घाण अतिक्रमण हटवल्यानंतर उघड्यावर समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ दिसत असून दुर्गंधीही पसरत आहे. पालखी मार्ग हा राज्यभरातील भाविकांसाठी श्रद्धेचा मार्ग असल्याने या परिसराची तातडीने स्वच्छता करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सर्वप्रथम पालखी मार्ग सुरक्षित, स्वच्छ आणि खड्डेमुक्त करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागाने तात्काळ संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण परिसरातील कचरा हटवावा, खड्डे बुजवावेत, रस्ता समतल करावा आणि पालखी सोहळ्यापूर्वी परिसर स्वच्छ व सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारंवार दूरध्वनी करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे आणि वारकऱ्यांच्या सुख सुविधांकडे प्रशासन नेमके कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



