महाराष्ट्र

अकलूज-महाळुंग रोडवरील लॉज वरती छापा, अकलूजमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सायंकाळी सुरू होणाऱ्या काळ्या धंद्याचा अखेर भांडाफोड; अकलूज हादरवणाऱ्या दुहेरी कारवाईचा इन महाराष्ट्र न्यूज स्पेशल रिपोर्ट

अकलूज | प्रतिनिधी
अकलूज परिसरात सुरू असल्याचा संशय असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी धडक कारवाई करत कथित हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन लॉज मालक व दोन व्यवस्थापक अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अकलूज व परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनैतिक मानवी व्यापाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTU) अकलूज परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने बनावट ग्राहक, चिन्हांकित नोटा आणि पूर्वनियोजित संकेतांच्या आधारे सापळा रचण्यात आला.
पहिली कारवाई : महाळुंग रोडवरील खासगी इमारतीवर छापा
पहिली कारवाई अकलूज-महाळुंग रोडवरील एका खासगी दोन मजली इमारतीवर करण्यात आली. ही इमारत विनायक काशिनाथ आडद यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला दोन हजार रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन आत पाठवले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पूर्वनियोजित संकेत मिळताच सायंकाळी सुमारे ५.०५ वाजता पोलिसांनी धाड टाकली.
छाप्यात इमारतीचा मालक विनायक काशिनाथ आडद तसेच स्वतःला व्यवस्थापक सांगणारा महादेव आप्पा चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. इमारतीतील खोल्यांची तपासणी केली असता दोन महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या कारवाईत बनावट ग्राहकाकडील २ हजार रुपयांच्या चिन्हांकित नोटा, दोन मोबाईल फोन तसेच १४ सीलबंद निरोध पाकिटांसह सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई : लयभारी लॉजिंगवर मध्यरात्री धडक
पहिल्या कारवाईनंतरही पोलिसांचे पथक थांबले नाही. त्याच दिवशी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अकलूज-महाळुंग रोडवरील बडेनगर येथील लयभारी लॉजिंगवर दुसरी धडक कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी महिलांना कामाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळीही पोलिसांनी १५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटांसह बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.
या कारवाईत लॉज मालक हेमंत नामदेव बडे आणि व्यवस्थापक सचिन राजाराम बनसोडे यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान एका खोलीतून एका महिलेची सुटका करण्यात आली. प्राथमिक चौकशीत तिला स्वयंपाकाचे काम देण्याच्या बहाण्याने बोलावून नंतर या व्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईत १५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत
दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन मालक आणि दोन व्यवस्थापक अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंधक) कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सखोल तपास सुरू
पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे प्रकार सुरू आहेत का, याचाही तपास केला जात आहे. या कारवाईत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीडितांची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक
या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या महिला या पीडित असून त्यांची ओळख कायद्याने गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमाने अथवा व्यक्तीने त्यांची ओळख उघड होईल अशी माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
परिसरात खळबळ
अकलूजमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि अनैतिक मानवी व्यापाराशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अशा प्रकारच्या रॅकेटवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!