महाराष्ट्र

श्रीपूरला विकासाची नवी दिशा | अतिक्रमणमुक्त जागेवर उभारणार आकर्षक सुशोभीकरण प्रकल्प

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय; शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचा होणार कायापालट?

इन महाराष्ट्र न्यूज | विशेष वृत्त

श्रीपूरच्या सुशोभीकरणाला गती; अतिक्रमणमुक्त जागेसाठी १ कोटींचा निधी मंजूर

श्रीपूर | प्रतिनिधी

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीने अतिक्रमणमुक्त केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य मार्गावरील मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा निधी मंजूर करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे भाजप गटनेते राहुल (आप्पा) रेडे-पाटील यांनी दिली.

अतिक्रमण हटविल्यानंतर निर्माण झालेल्या मोकळ्या जागेचा नियोजनबद्ध विकास करून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या अंतर्गत रस्त्यालगत हरित पट्टा, आकर्षक पेव्हिंग ब्लॉक, आधुनिक विद्युत रोषणाई, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच अन्य नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराला स्वच्छ, सुबक आणि आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.

राहुल (आप्पा) रेडे-पाटील यांनी माळशिरसचे मा.आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या सहकार्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निधीची मागणी करणारे निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

महाळुंग-श्रीपूर शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर रिकामी झालेल्या जागेचा लोकहितासाठी आणि शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना नगरसेवक निनाद पटवर्धन, रावसाहेब सावंत-पाटील, विक्रम लाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

“सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना”

“श्रीपूर येथील अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल.” –– राहुल (आप्पा) रेडे-पाटील,भाजप गटनेते, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत


Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!