अकलूजचे नवे डीवायएसपी संतोष वाळके यांचा पत्रकारांशी संवाद – तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन
“जनतेचा विश्वास आणि सुरक्षितता आमचे ध्येय”-संतोष वाळके : DYSP

पत्रकार-डीवायएसपी संवाद बैठकीत उघड झाल्या परिसरातील समस्या
अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके रुजू, पत्रकारांशी संवाद
इन महाराष्ट्र न्यूज (संपादक : दत्ता नाईकनवरे) – अकलूज पोलीस विभागात नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून संतोष शिवदास वाळके यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पहिला पाऊल उचलला आहे.
रुजू होताच त्यांनी विभागातील पत्रकारांना बोलावून संवाद साधला. या संवादादरम्यान सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध समस्या, गुन्हेगारी प्रकरणे, मुली, महिला, कॉलेज विद्यार्थिनींच्या अडचणी, वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी तसेच शांतता आणि सुव्यवस्था याबाबत पत्रकारांकडून सविस्तर माहिती घेतली. पत्रकारांनी मांडलेल्या तक्रारी व सूचनांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन डीवायएसपी वाळके यांनी दिले.
माळशिरस तालुक्यामधील सर्व पोलीस स्टेशन आणि आपल्या विभागात शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असून, नागरिकांच्या तक्रारी, अडचणी कायद्याच्या मार्गाने तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीस अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, विविध माध्यमांचे पत्रकार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.