हुंडाबळी, छळ व जबरदस्ती वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेची अकलुज पोलीसांकडे धक्कादायक तक्रार
विवाहित महिलेवर ८ आरोपींनी केले अत्याचार

अकलुजमध्ये महिला छळ प्रकरण; सासरकडून पाच लाखांच्या मागणीवरून अत्याचार, पतीसह सासरच्यांचा अमानवी छळ; मारहाण, धमक्या आणि सेक्स रॅकेटचे आरोप, अकलुज पोलिसांत गुन्हा दाखल;
अकलुज प्रतिनिधी :
अकलुज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अकलुज येथील सौ. (पीडित महिला, वय 44) यांनी आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, हुंडाबळी, धमक्या, तसेच जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत.
फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार, तिचे लग्न २ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील मंगल कार्यालयात प्रविण यांच्यासोबत झाले. परंतु लग्नानंतर केवळ काही दिवसातच तिच्या पतीसह सासरकडून पाच लाख रुपये व दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र माहेरहून आणण्याची मागणी सुरु झाली. या मागणीस नकार दिल्यानंतर तिला वारंवार उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि दमदाटी करण्याचे प्रकार घडले.
फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, पती प्रविण तसेच सासू सुनिता, दीर प्रशांत, जाऊ गौरी, नणंद साक्षी व तिचा पती सुहास यांनी संगनमत करून वारंवार पैशाची मागणी केली. इतकेच नव्हे तर, पती प्रविणने तिला माहेरी अकलुज येथे आणून भावंडांकडून पैसे आणण्यास भाग पाडले. तिच्याकडून पूर्वी ४ लाख ६३ हजारांहून अधिक रक्कम घेण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या जबाबानुसार सासरच्यांनी तिला मुंबई व रायगड येथे नेऊन घरात डांबून ठेवले. त्यावेळी तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आले. नकार दिल्यानंतर तिचे हातपाय बांधणे, केस कापणे, शॉर्ट कपडे घालण्यास भाग पाडणे आणि सतत प्राणघातक धमक्या देणे अशा अमानुष प्रकारांना तिला सामोरे जावे लागले.
फिर्यादीने आपल्या जबाबात स्पष्ट केले की, आरोपींच्या तावडीत असताना तिला पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. तिचा मोबाईल काढून घेण्यात आला होता. माहेरहून फोन आल्यास स्पीकरवरच बोलण्याचा बंधनकारक नियम तिला पाळावा लागत होता. त्यामुळे बराच काळ तक्रार नोंदवता आली नाही.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८५, १२६(२), ७४, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा अकलुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीकडे फोन कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहारांची पुरावे असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.