लोकन्यायालयांपासून अलिप्त राहणार | माळशिरस बार असोसिएशनचा निर्णय
लोकन्यायालयात असहकार आंदोलनाचा माळशिरस बार असोसिएशनचा निर्णय

संघटनेचा विश्वासघात केल्यास कायमस्वरूपी कारवाई – ठराव सर्वानुमते मंजूर | वकिल संघटनेची एकता जपण्यासाठी कठोर पाऊल
माळशिरस बार असोसिएशनचा ठराव – लोकन्यायालयांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय
माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस बार असोसिएशनची सभा बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० वाजता संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. राहुल लवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेत चर्चेस आलेल्या मुद्द्यांनुसार, येत्या दि. १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकन्यायालय तसेच महसुली लोकन्यायालय यामध्ये बार असोसिएशन अलिप्त राहणार असून, कोणत्याही प्रकारे सहभाग नोंदवला जाणार नाही, असा ठराव करण्यात आला.
या संदर्भात अॅड. विशाल पाटील, अॅड. एस. ई. वाघमोडे, अॅड. आर. टी. जगताप, अॅड. नितीन पिसे, अॅड. पी. ई. कुलकर्णी यांसह अनेक सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. सर्व सदस्यांनी एकमताने लोकन्यायालयापासून अलिप्त राहण्याचे ठरविले.
ठरावानुसार, जर कोणत्याही वकिल सदस्याने लोकन्यायालयात सहभाग नोंदविला, पॅनलवर बसून तडजोड घडवून आणली किंवा लोकन्यायालयाच्या कामकाजात थांबला, तर असे कृत्य संघटनेच्या हिताविरुद्ध समजले जाईल. अशा वकिलांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा कठोर निर्णयही सभेत घेण्यात आला.
तसेच दि. १२ सप्टेंबर रोजी तहसिलदार कार्यालयात होणाऱ्या लोकन्यायालय व दि. १५ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयात होणाऱ्या लोकन्यायालयांमध्येही असहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. संघटनेची एकता अबाधित राहावी, संघटनेवर कुठलेही गालबोट लागू नये, या उद्देशाने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेतील ठरावाला अॅड. एस. ई. वाघमोडे यांनी सुचविले तर अॅड. आर. टी. जगताप यांनी अनुमोदन दिले.