महाळुंग हद्दीत पिकअप पलटी; नागरिक संतप्त-“उड्डाणपूल तात्काळ करा!”
वारंवार अपघात, वारंवार ओरड… तरीही प्रशासनचे मौन का?

24 तासांत दुसरा अपघात! महाळुंग पालखी महामार्गवर कोंबड्यांचा पिकअप पलटी
महाळुंग हद्दीतील टेंभुर्णी कडे जाणारा रस्ता चौक बनला मृत्यूचा सापळा
महाळुंग पालखी महामार्गावर धोका कायम; नागरिकांची ठाम मागणी — फ्लायओव्हर हवा!
महाळुंग पालखी महामार्गावर पुन्हा अपघात
महाळुंग (ता. माळशिरस) — संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर अवघ्या 24 तासांपूर्वी एका अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. आणि आज सोमवारी सकाळी पुन्हा त्याच परिसरात भीषण अपघात होऊन नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
टेंभुर्णी दिशेने कोंबड्यांनी भरलेला पिकअप वाहन अकलूजच्या दिशेने येत असताना महाळुंग हद्दीतील चौकात रस्ता क्रॉस करताना तो अचानक उलटला. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पालखी महामार्गावरच वाहन पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या दुर्घटनेत चालक थोडा जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने मोठ्या जीवितहानीचा प्रसंग टळला.
या चौकात अकलूज-टेंभुर्णी दरम्यान 25/4 मार्गे 24 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते. तसेच टेंभुर्णीच्या दिशेने अकलूजला जाणाऱ्या वाहनाला पालखी महामार्गावरून हा चौक क्रॉस करावा लागतो. त्यामुळे आधीही येथे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या ठिकाणी सतत ट्राफिक जाम होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही काही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रवाशा मधून आणि स्थानिक लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांची ठाम मागणी अशी की —
“या ठिकाणी तातडीने उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारावा. वाहतूक थेट त्यातून द्यावी, अन्यथा अजून किती जीव जाणार?”
अपघातानंतर नॅशनल हायवे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेला पिकअप बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वारंवार होणाऱ्या या अपघातांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. येणाऱ्या काळात जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.



