महाराष्ट्र

रातोरात बातमी पोहोचवणारा तो योद्धा | शरदराव लोहकरे आज काळाच्या पडद्याआड

अकलूजचे ज्येष्ठ फोटोग्राफर पत्रकार शरदराव लोहकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

[इन महाराष्ट्र साठी दत्ता नाईकनवरे]
अकलूज शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर पत्रकार, कष्टाळू आणि नि:स्वार्थ वृत्तसेवा करणारे शरदराव विश्वंभर लोहकरे (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने अकलूज व माळशिरस तालुक्यातील फोटोग्राफर पत्रकारिता क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

शरदराव लोहकरे हे नाव म्हणजे साधेपणा, प्रामाणिकता आणि कठोर परिश्रमाचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांच्या पाश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परीवार आहे. दै. लोकमतचे प्रतिनिधी राजीव लोहकरे आणि दै. जनमतचे पत्रकार व प्रेस फोटोग्राफर संजय लोहकरे यांचे ते वडील होते.

गेल्या चार दशकांपासून त्यांनी तालुक्यातील प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी निगडित फोटो, बातम्या, वेगाने आणि जबाबदारीने सोलापूरसह अनेक दैनिकांना पोहोचवल्या.
दुपारी साडेचारनंतर सुरू झालेला त्यांचा प्रवास पहाटेपर्यंत चालायचा. कधी एसटीने जाणे, कधी रिक्षांचे तासभरचे चकरा… तरीही बातमी आणि रील कॅमेऱ्याच्या जमान्यातील महत्वाचे, बातमीशी निगडित फोटो वेळेत पोहोचवण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर जपले. गरज पडली तर ते दैनिकांच्या कार्यालयात मुक्काम करून, पहाटेच्या चारच्या गाडीने परत अकलूजला यायचे.

हे सर्व करताना एकच ध्यास –
“मुलांनी पत्रकारितेत नाव कमवावे, त्यांचं करिअर उंच भरारी घ्यावं.”

त्या काळी सोलापूरचं तिकीट ३० रुपये आणि शहरात रिक्षा ६० रुपये. या सर्व खर्चातूनही त्यांनी मुलांच्या बातमीदारीला बळकटी मिळावी यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले. आजचे युग डिजिटल असले तरी त्या काळातील त्यांची धावपळ, निष्ठा, प्रवास आणि अखंडित तळमळ ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

आजच्या पत्रकारितेला त्यांच्या कार्याचा वेगळा आदर्श आहे. कारण आज आपण जी ‘ब्रेकिंग न्यूज’ पाहतो, त्यामागे अशा अनेक पिढ्यांचे प्रामाणिक परिश्रम दडलेले आहेत.

शरदराव लोहकरे यांच्या आठवणी सांगताना अनेक पत्रकार भावूक होत आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ एक ज्येष्ठ फोटोग्राफर पत्रकार हरपला नाही, तर फोटोग्राफर पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पणाचा एक दीपही विझला आहे.

“जाता जाता एकच असे वाटते की, तुम्ही आम्ही सध्याची पत्रकारिता पाहिली तर आपल्या मुलांना मनापासून प्रामाणिकपणे प्रश्न विचारून सांगायच की, पत्रकारिता क्षेत्रांमध्ये  पूर्ण करिअर करण्यासाठी पाठवू का? कारण हे क्षेत्र तुम्ही आम्ही सध्या अनुभवत आहात…. ”

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!